भाज्या, इंधन दरवाढीने निर्देशांक ५ टक्क्यांसमीप!

महागाईबाबतची रिझव्‍‌र्ह बँकेची भीती सार्थ ठरविताना नोव्हेंबरमधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक ५ टक्क्यांपर्यंत पोहोचताना १५ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. भाज्या तसेच इंधनाच्या वाढत्या दराने यंदा महागाईचा भडका उडाला आहे.

आधीच्या, ऑक्टोबरमध्ये महागाई दर ३.५८ टक्के तर वर्षभरापूर्वी, नोव्हेंबर २०१६ मध्ये तो ३.६३ टक्के होता. यापूर्वी, ऑगस्ट २०१६ मध्ये महागाई दर सर्वोच्च अशा ५.०५ टक्क्यांवर पोहोचला होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी याबाबतची ताजी आकडेवारी जाहीर केली.

यानुसार गेल्या महिन्यात भाज्यांचे दर तब्बल २२.४८ टक्क्यांपर्यंत झेपावले आहेत. आधीच्या महिन्यात या जिन्नसातील किंमतवाढ ७.४७ टक्केच होती.

अंडय़ांचे दर ७.९५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. नोव्हेंबर या थंडीच्या महिन्यात या अन्नपदार्थाला असलेल्या मागणीने जोर धरला आहे. तर इंधन, ऊर्जा गटातील महागाई ७.९२ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

डाळींच्या दरातही गेल्या महिन्यात उतार नोंदला गेला आहे. २३.५३ टक्क्यांनी डाळींचे भाव कमी झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये एकूण अन्नधान्याचा महागाई दर वर्षभरापूर्वीच्या १.९ टक्क्यांवरून ४.४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

चालू आर्थिक वर्षांतील पाचव्या द्विमासिक पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने उर्वरित अर्ध वित्त वर्षांत महागाई वाढण्याची भीती व्यक्त करताना व्याजदर स्थिर ठेवले होते. संपूर्ण वित्त वर्षांतील महागाईचा अंदाज आधीच्या ४.२ ते ४.६ टक्क्यांवरून ४.३ ते ४.७ टक्क्यांपर्यंत असेल, असे नमूद केले होते.