सणांचा हंगाम सुरू झाला असताना भारतीय वाहन बाजारपेठेने मात्र सरलेले ऑगस्टमध्ये यथातथाच कामगिरी केली आहे. या महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री अवघी ६ टक्क्य़ांनी वाढली तर मोटरसायकल विक्री वार्षिक तुलनेत ९.६ टक्के घसरली आहे.

ऑगस्टमध्ये सलग १० व्या महिन्यात प्रवासी कार विक्री वाढताना ती १,६३,०९३ झाली आहे. मारुती, ह्य़ुंदाई, महिंद्र यांनी गेल्या महिन्यात किरकोळ वाहन विक्रीतील वाढ नोंदली आहे. तर होन्डा, टाटा मोटर्स यांनी दुहेरी आकडय़ातील वाढ राखली होती.
ऑगस्टमधील मोटरसायकल विक्री आधीच्या महिन्यातील ९.१० लाखांवरून ८,२३,०५३ झाली आहे. मान्सूनअभावी कृषी क्षेत्रात चिंताजनक वातावरण असून त्याचा फटका नव्या दुचाकी खरेदीवर झाल्याचे वाहन उत्पादन संघटना ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी म्हटले आहे.
हीरो मोटोकॉर्प, होन्डा यांच्या मोटरसायकल विक्रीत यंदा घसरण झाली आहे, तर स्कूटर विक्रीत होन्डासह टीव्हीएसने वाढ नोंदविली आहे. स्कूटर प्रकारातील वाहन विक्री ऑगस्टमध्ये १५.६६ टक्क्य़ांनी वाढली आहे. गेल्या महिन्यात एकूण वाहन विक्रीत २.०७ टक्के घसरण नोंदली गेली आहे. सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या महिन्यात जॅझ (होन्डा), अ‍ॅस्पायर (फोर्ड), क्रेटा (ह्य़ुंदाई), एस-क्रॉस (मारुती-सुझुकी) ही नवी वाहने बाजारपेठेत दाखल झाली आहेत.
महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रचे ‘टीयूव्ही ३००’ हे कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील वाहन गुरुवारी कंपनीच्या चाकण (पुणे) येथील प्रकल्पात सादर करण्यात आले. या गटातील फोर्ड इकोस्पोर्ट, रेनो डस्टर (७.८८ ते १३.५४ लाख रुपये) वाहनांच्या तुलनेत ६.९ ते ९.१२ लाख रुपये अशा कमी किमतीतील या वाहनाने टोयोटाच्या इटिऑस क्रॉस, ह्य़ुंदाई आय२० अँक्टिव, फियाट अव्हेंच्युरा (६.२३ ते १३.५४ लाख) यांनाही ऐन सणांच्या हंगामात आव्हान उभे केले आहे.