चारचाकीच्या किंमती ३.५० लाख, तर दुचाकींच्या ५ हजारांपर्यंत कमी; ‘जीएसटी’ची मात्रा लागू

मान्सून हंगामाच्या कालावधीत वाहन कंपन्यांकडून घसघशीत सूट-सवलत खरेदीदारांना देण्यात आली आहे. मात्र यासाठी निमित्त आहे ते जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कराचे. १ जुलैपासून लागू झालेल्या या नव्या करप्रणालीत वाहनांवरील कर आधीच्या तुलनेत कमी झाल्याने सर्वच गटातील प्रवासी वाहने अगदी ३५० ते तब्बल ३.५० लाख रुपयेपर्यंत स्वस्त झाली आहेत.

गेल्या महिन्यातील विक्री रोडावल्याचा कटू अनुभव गाठीशी धरून प्रत्यक्ष वस्तू व सेवा करासहित अधिभाराची मात्रा व्यवसायावर विपरित परिणाम नोंदविण्याची भीती वाहन उत्पादक कंपन्यांनी नोंदविली आहे. त्यातच वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या विविध वाहनांच्या किंमती कमालीच्या खाली आल्या आणल्या आहेत. दुचाकी, चार चाकी प्रवासी वाहने तसेच स्पोर्ट यूटिलिटी आदी वाहनांच्या किंमती तातडीने कमी झाल्या आहेत. १ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू व सेवा करामुळे वाहन क्षेत्रावर २८ टक्क्य़ांपर्यंत कर व १५ टक्क्य़ांपर्यंतचा अधिभार लागू झाला आहे. यामुळे विशेषत: लहान वाहने, स्पोर्ट यूटिलिटी वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहेत. तसेच ३५० सीसी क्षमतेपेक्षा कमी इंजिनक्षमतेच्या दुचाकीही स्वस्त झाल्या आहेत. गेल्या महिन्यातील विक्री घसरण नोंदविल्यानंतर किंमती कमी करून कंपन्यांनी चालू महिन्यात त्यात वाढ अपेक्षित केली आहे. वाहन खरेदीदार संख्या कायम राखण्याचा यातून वाहन उत्पादक कंपन्यांचा प्रयत्न आहे.

होंडा कार्स इंडिया, फोर्ड, मारुती सुझुकी आदी चार चाकी वाहन उत्पादकांसह टीव्हीएस, हीरो मोटोकॉर्प, सुझुकी मोटरसायकल या दुचाकी उत्पादकांनीही त्यांची विविध वाहने स्वस्त केली आहेत. वस्तू व सेवा करामुळे चार मीटरपेक्षा कमी व १,५०० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा कमी प्रवासी कार तसेच स्पोर्ट यूटिलिटी वाहने स्वस्त झाली आहेत.

होंडा कार्स इंडियाने तिच्या विविध कारच्या किंमती त्वरित १.३१ लाख रुपयांनी कमी केल्या आहेत. यामध्ये ब्रिओ, अमेझ, जॅझ, डब्ल्यूआर-व्ही, सिटी, बीआर-व्ही, सीआर-व्ही, एकॉर्ड आदींचा समावेश आहे. फोर्डने ४.५ टक्केपर्यंत किंमती कमी करताना त्याचा लाभ तिच्या हॅचबॅक, स्पोर्ट यूटिलिटी आदी श्रेणींतील वाहनांकरिता देऊ केला आहे. दुचाकीमध्ये टीव्हीएसच्या वाहनांच्या किंमती ४,१५० रुपयेपर्यंत कमी झाल्या आहेत. होंडा मोटरसायकलनेही तिच्या दुचाकींच्या किंमती ५,५०० रुपयेपर्यंत स्वस्त केल्या आहेत.

vehical-chart

अधिभाराच्या चिंतेने जीएसटीपूर्वी विक्रीत घसरण

अधिभार वाढणार असल्याची चिंता वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीपूर्वीच देशातील वाहन विक्रीवर उमटल्याचे चित्र गेल्या महिन्यात स्पष्ट झाले. विक्रेत्यांकडील वाहन साठा जूनअखेर संपविण्याच्या धास्तीनेही खरेदीदार वाहनांकडे वळले नसल्याचे दिसून आले आहे. जूनमध्ये देशातील प्रवासी वाहन विक्री कमालीची रोडावली आहे. मारुती सुझुकी वगळता इतर प्रमुख कंपन्यांची विक्री गेल्या महिन्यात नकारात्मक स्थितीत राहिली आहे. मारुती सुझुकीची वाढही जूनमध्ये अवघ्या एक टक्क्य़ाने वाढत एक लाखाच्या आत, ९३,२६२ पर्यंत जाऊ शकली आहे. तर ह्य़ुंदाई मोटर इंडियाने विक्रीतील ५.६ टक्के घसरण गेल्या महिन्यात नोंदविली. कंपनीने जूनमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत एकूण ३७,५६२ वाहने विकली. टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत १० टक्के घसरणीसह ११,१७६ वाहने विकली गेली. मात्र कंपनीच्या हॅचबॅक श्रेणीतील नवागत टिआगोने एक लाख नोंदणीचा अनोखा टप्पा पार केला आहे. तर स्पर्धक महिंद्र अँड महिंद्रची विक्री ३ टक्क्य़ांनी घसरून ३३,८६१ पर्यंत आली आहे.