श्रीमंतांसह मध्यमवर्गीयांचेही स्वप्न बिकट
ऐन सण-समारंभातही कमी विक्रीचा सामना करावा लागणाऱ्या वाहननिर्मिती कंपन्यांनी नव्या वर्षांपासून आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविण्याचे ठरविले आहे. ऑडी, मर्सिडिज बेन्झसारख्या आलिशान मोटार उत्पादक कंपन्यांबरोबरच मध्यमवर्गीयांसाठी वाहने तयार करणाऱ्या मारुती, ह्य़ुंदाई यादेखील दरवाढीत सामील होत आहेत.
मागणीच्या मोसमातही कमी विक्रीचा फटका बसलेल्या वाहन उद्योगापुढे चलन अस्थिरता, इंधन दरवाढ आणि वाढते व्याजदर यांचा क्रम २०१३मध्ये राहिला आहे. नव्या वर्षांत थोडीफार कसर भरून काढण्याच्या इराद्याने अनेक कंपन्यांनी जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढविण्याचे जाहीर केले आहे. महिनाअखेर जाहिर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात पु्न्हा व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे.
याची सुरुवात गेल्या महिन्यात जर्मन बनावटीच्या ऑडीने किंमत वाढ जाहीर करून केली. याच श्रेणीतील मर्सिडिज बेन्झनेही १० टक्क्यांपर्यंत किंमत वाढ जाहीर केली आहे. आलिशान मोटार स्पर्धेतील तिसरी बीएमडब्ल्यू ही कंपनीही यात सहभागी झाली आहे.
याच आठवडय़ात जपानच्या होन्डा कंपनीनेही असाच किंमतवाढीचा इरादा जाहीर केला आहे. तिच्या वाढीव किमतीदेखील जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासूनच लागू होणार आहेत.
देशातील पहिल्या क्रमांकाच्या मारुती सुझुकीनेही जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढविण्याचे निश्चित केले आहे. त्याचबरोबर ह्य़ुंदाईनेही हाच इरादा स्पष्ट केला आहे. उभय कंपन्यांनी मात्र किती प्रमाणात किमती वाढविण्यात येतील, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मारुती सुझुकी २.१३ ते २४.६० लाख रुपयांपर्यंतची विविध १३ वाहने विकते. कंपनीने ऑक्टोबरमध्येही वाहनांच्या किमती १० हजार रुपयांपर्यंत वाढविल्या होत्या. ह्य़ुंदाईची वाहनेदेखील २.८९ ते २६.६९ लाख रुपये दरम्यान आहेत.

वाहनांवरील कर्ज फुगले
वाहन उद्योगाला बसलेला आर्थिक मंदीचा फटका व्यापारी वाहनांचे कर्ज नव्या उच्चांकावर नेऊन ठेवण्यात परावर्तित झाले आहे. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत हे प्रमाण ३ टक्क्यांवर गेले आहे. ‘इंडिया रेटिंग्ज’ने याबाबत अभ्यास केला असून वाहनांवरील व्यवसाय दबाव आणखी दोन तिमाही कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. व्यापारी वाहनांवरील कर्जाचे प्रमाण वर्षभरापूर्वीच्या २.४ टक्क्यांवरून जुलै ते ऑगस्ट या तिमाहीत ३ टक्के झाले आहे.