सर्वाधिक २१ टक्के घटीचा फटका वाणिज्य वाहनांना

नवी दिल्ली : करोना साथ प्रसार आणि परिणामी अनुभवलेल्या टाळेबंदी वर्षांत देशातील प्रवासी वाहन विक्रीला फटका बसला आहे. या संपूर्ण वित्त वर्षांत चारचाकी वाहनांच्या विक्रीत २.२४ टक्के तर दुचाकीत तब्बल १३.१९ टक्के घसरण नोंदली गेली आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री २.२४ टक्क्यांनी रोडावून २७.११ लाख झाली आहे. तर दुचाकी विक्री १३.१९ टक्क्यांनी घसरून १.५१ कोटी झाली आहे. आधीच्या वित्त वर्षांत चारचाकी व दुचाकीची विक्री अनुक्रमे २७.७३ लाख व १.७४ कोटी होती.

भारतातील वाहन विक्रीवर टाळेबंदीचा विपरीत परिणाम झाल्याचे वाहन निर्मिती कंपन्यांची देशव्यापी संघटना ‘सियाम’ने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स) ने नमूद केले आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत देशात ५.६८ लाख वाणिज्य वापराची वाहने विकली गेली. आधीच्या वित्त वर्षांच्या तुलनेत त्यात यंदा २०.७७ टक्के घसरण झाली आहे. तर २.१६ लाख तीनचाकी वाहनांची विक्री झाली. या वाहन प्रकारातील घसरण थेट ६६.०६ टक्के आहे. सर्व गटातील वाहने मिळून देशात गेल्या आर्थिक वर्षांत १.८६ कोटी वाहनांची विक्री झाली आहे. वार्षिक तुलनेत त्यात १३.६ टक्के घसरण नोंदली गेली आहे.

गेल्या वित्त वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत प्रवासी वाहने वगळता इतर सर्व गटांतील वाहन विक्रीत घसरण झाल्याचे ‘सिआम’चे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले. त्यातही तीनचाकी वाहन विक्रीला अधिक फटका बसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात – मार्चमध्ये मात्र सर्वच गटातील वाहन विक्रीत जवळपास दुप्पट विक्री झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

सहा महिन्यांत ५० हजार ‘महिंद्र थार’साठी नोंदणी

ल्ल  स्थापनेच्या अमृत महोत्सवाला  बाजारपेठेत दाखल झालेल्या ‘महिंद्र’च्या थारची सहा महिन्यांत ५० हजारांहून नोंदणी झाली आहे. आकर्षक रंग-रूपातील हे वाहन नोंदणीनंतर अनेक महिन्यांचा प्रतीक्षा काळ पूर्ण केल्यावर ग्राहकाला मिळते. यावर उपाय म्हणून नाशिक प्रकल्पात निर्मिती क्षमता विस्तारण्यात येत असल्याचे महिंद्रच्या वाहन विभागाचे मुख्याधिकारी विजय नाकरा यांनी सांगितले.