नवी दिल्ली : देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीचा प्रवास फेब्रुवारीमध्ये काहीसा नकारात्मक राहत वार्षिक तुलनेत १.११ टक्क्याने रोडावली आहे. गेल्या आठ महिन्यांपैकी सातव्या महिन्यात वाहन विक्रीत घसरण नोंदली गेल्यामुळे वाहन उत्पादक संघटनेने चालू आर्थिक वर्षांचे विक्री लक्ष्यही खाली आणले आहे.

‘सिआम’च्या अंदाजानुसार २०१८-१९ दरम्यान वाहन विक्रीतील वाढ सहा टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. वाढते व्याजदर आणि इंधन तसेच विम्याची वाढीव किंमत यामुळे खरेदीदारांनी वाहनांसाठी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला नसल्याचे संघटनेचे महासंचालक विष्णू माथूर यांनी म्हटले आहे.

यंदाच्या फेब्रुवारीमध्ये एकूण देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री २,७२,२८४ झाली आहे. वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१८ मध्ये ती २,७५,३४६ होती. चालू वित्त वर्षांत आतापर्यंत केवळ ऑक्टोबरमध्ये वाहन विक्रीत वाढ नोंदली गेली आहे. अन्यथा जुलै २०१८ पासून वाहन विक्रीत घसरणच होत होती.

एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान एकूण प्रवासी वाहन विक्री मात्र ३.२७ टक्क्यांनी वाढून ३०,८५,६४० झाली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती २९,८७,८५९ होती. तरी ती वार्षिक ८ ते १० टक्के वाढीचे अपेक्षित लक्ष्य गाठू शकणार नाही.