29 September 2020

News Flash

वर्षांरंभही निराशाजनकच!

देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत जानेवारी २०१९ मध्ये घसरण

देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत जानेवारी २०१९ मध्ये घसरण

देशातील प्रवासी वाहन विक्रीबाबत २०१९ ची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. जानेवारीमध्ये मारुतीसह अनेक आघाडीच्या वाहन उत्पादकांना कमी विक्रीला सामोरे जावे लागले आहे. नव्या वर्षांपासूनच अनेक वाहन उत्पादकांनी त्यांची विविध वाहने महाग केली होती. हे प्रमाण ५ टक्क्य़ांपर्यंत वाढले होते. चलनातील फरक व वाढत्या सुटय़ा भागांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

बिगर बँकिंग वित्त कंपन्यांवरील संकट कायम राहिल्याचे या ताज्या आकडेवारीच्या प्रवासावरून स्पष्ट होत आहे. तसेच इंधनाच्या वाढत्या दरांनी खरेदीदारांनी फारसा उत्साह दाखविल्याचेही या आकडेवारीवरून जाणवते.

वाहन विक्रीत अव्वल असलेल्या मारुती सुझुकीच्या देशातींतर्गत प्रवासी वाहन विक्रीत अवघ्या एक टक्क्य़ाची वाढ नोंदली गेली आहे. कंपनीची या दरम्यान १,४२,१५० वाहन विक्री झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधी दरम्यान ती १,४०,६०० होती.

मारुतीची स्पर्धक ह्य़ुंदाई मोटर इंडियानेही गेल्या महिन्यात एकच टक्क्य़ाची वाहन विक्री वाढ राखली आहे. कंपनीने वर्षभरापूर्वीच्या ४५,५०८ वाहनांच्या तुलनेत यंदा ४५,८०३ वाहने विकली आहेत. टोयोटा किलरेस्करच्या वाहन विक्रीत ९.१ टक्के घसरण होऊन जानेवारीमध्ये ती ११,२२१ झाली आहे. जानेवारी २०१८ मध्ये कंपनीने १२,३५१ वाहनांची विक्री राखली होती.

तर होंडाच्या वाहन विक्रीत थेट २३ टक्क्य़ांची झेप नोंदली गेली आहे. जपानी कंपनीने जानेवारी २०१९ मध्ये १८,२६१ वाहन विक्री नोंदविताना वर्षभरापूर्वीच्या १४,८३८ विक्रीला यंदा मागे टाकले आहे. महिंद्र अँड महिंद्रची वाहन विक्री स्थिर राहिली आहे. जानेवारी २०१९ मध्ये कंपनीने २२,३९९ वाहने विकली. टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत मात्र १३ टक्के घसरण झाली आहे. जानेवारी २०१८ मधील २०,०५५ वाहनांच्या तुलनेत कंपनीने यंदाच्या जानेवारीत १७,८२६ वाहने विकली.

फोर्ड इंडियाला १९ टक्के घसरणीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीने वर्षभरापूर्वीच्या ९,४५० वाहनांच्या तुलनेत यंदा कमी, ७,७०० वाहने विकली आहेत. तसेच रेनोने १६ टक्के घसरण नोंदविताना यंदा ५,८२५ वाहनांची विक्री केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये ती ६,९१९ होती. निस्सानच्या वाहन विक्रीत २५ टक्के घसरण होताना ती वर्षभरापूर्वीच्या ४,२०८ वाहनांच्या तुलनेत यंदा ३,१४६ वाहनांपर्यंतच झाली आहे. फोक्सवगनलाही १८ टक्के घसरणीचा सामना करावा लागला आहे.

पेट्रोल दुचाकीच्या बदल्यात हीरोची इलेक्ट्रिक

विजेवर धावणाऱ्या दुचाकींना चालना देण्याचा एक प्रयत्न म्हणून आघाडीच्या हीरो इलेक्ट्रिकने अनोखी योजना सादर केली आहे. यानुसार पेट्रोलवर धावणाऱ्या कोणत्याही दुचाकीच्या बदल्यात हीरो इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता ६,००० रुपयांपर्यंत सूट आहे. तसेच नव्या विजेरी दुचाकी व बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी देण्यात येणार आहे. हीरो इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ४६,००० ते ८७,००० रुपये दरम्यान आहे. नव्या मोहिमेबाबत कंपनीने देशभरातील प्रमुख शहरांमध्ये प्रसार करत आहे. हीरो इलेक्ट्रिकचे देशभरात ४५० हून अधिक विक्रीजाळे आहे. देशभरात सध्या मोठय़ा प्रमाणात प्रदुषण निर्माण करणाऱ्या ५ कोटींहून अधिक जुन्या दुचाकी धावत असल्याचे सांगण्यात येते.

  • मारुती – १,४२,१५०
  • ह्य़ुंदाई मोटर – ४५,८०३
  • टोयोटा किलरेस्कर – ११,२२१
  • होंडा – १८,२६१
  • फोर्ड इंडिया – ७,७००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:27 am

Web Title: vehicle sales in india
Next Stories
1 रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीस
2 अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, शेअर बाजार ४०० अंकांनी वधारला
3 Budget 2019 : ४० हजारांपर्यंतचे व्याज करमुक्त
Just Now!
X