टीव्हीएस मोटर कंपनी आणि सुंदरम क्लेटन या कंपन्यांचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांना प्रतिष्ठेच्या डेमिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टोक्यो (जपान) येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय उद्योगपती आहेत.

संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाच्या (टीक्यूएम) क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल श्रीनिवासन यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला असल्याचे टीव्हीएस मोटर कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. डेमिंग पुरस्कार हा जपानच्या वैज्ञानिक व अभियंत्यांचा महासंघ ‘जेयूएसई’द्वारे प्रायोजित केला जातो.

श्रीनिवासन प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘डेमिंग पुरस्कार समिती आणि जेयूएसईने या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करून मोठा बहुमान दिला आहे. १९८९ पासून दोन्ही कंपन्यांमध्ये माझ्यासह, माझ्या सर्व सहकारी व कर्मचाऱ्यांनी गुणवत्तेची कास धरून केलेल्या परिश्रमाचेच हे कौतुक आहे.’ भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय)चे माजी अध्यक्ष आणि गुणवत्ता राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष या नात्यानेही श्रीनिवासन यांनी देशाच्या उद्योगजगतात ‘टीक्यूएम’ला चालना देण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे.