राजकारणात गुजराती – मराठी वाद तर विकासात गुजरात – महाराष्ट्र अशी रस्सीखेच सुरू असताना गुजरातच्या मुख्यमंत्री सोमवारी पुन्हा मुंबई दौऱ्यावर आल्या. मुख्यमंत्रीपदी आरुढ झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांचा हा तिसरा महाराष्ट्र प्रवास होता. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) व्यासपीठावर त्यांनी ‘वायब्रन्ट गुजरात-२०१५’ची प्रसार मोहिम राबविली. उद्योग, कंपन्या तसेच गुंतवणूकदारांना आकर्षिक करू पाहणारे यंदाची सातवी परिषद येत्या जानेवारी २०१५ मध्ये होत आहे. व्यासपीठावर यावेळी गुजरातचे अर्थमंत्री सौरभ पटेल तसेच महासंघ या उद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष जमशेद गोदरेज हेही उपस्थित होते.
गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यास आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात येऊन आनंदीबेन पटेल यांनी विद्युत उपकरण, माहिती तंत्रज्ञान तसेच इ-गव्हर्नन्स या क्षेत्रात नवी धोरणे राबविण्याचे संकेत दिले. गुजरातमध्ये खासगी – सरकारी भागीदारी तत्त्वावर १८३ अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. याला सिमेन्सने ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक तयारी दर्शवून सहा केंद्रे सुरू करणारा पाठिंबाही दर्शविला. गुजरातच्या प्रमुख प्रशासकांबरोबरच यावेळी उद्योगपती अदि गोदरेज (गोदरेज समूह), बाबा कल्याणी (भारत फोर्ज), ए. एम. नाईक (एल अ‍ॅण्ड टी), दीपक पारेख (एचडीएफसी), स्वाती पिरामल (पिरामल फार्मा), सज्जन जिंदाल (जिंदाल समूह), अशोक हिंदुजा (अशोक लेलॅण्ड), आर. मुकुंदन (टाटा सन्स) आदी उपस्थित होते.