देशाबाहेर पलायनाच्या अफवांनी समभागांची ४ टक्क्य़ांचीघसरगुंडी

बँकांचे २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कर्ज थकविलेल्या आणि दिवाळखोरी संहितेप्रमाणे प्रक्रिया सुरू करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकांना सूचित करण्यात आलेल्या २८ कंपन्यांपैकी एक असलेल्या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने बँकांचे सर्व थकलेले कर्ज फेडले जाईल आणि त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. बँकांचे कर्ज बुडविण्यासाठी प्रवर्तकांनी देशाबाहेर पलायन केले असल्याचे एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त खोडसाळ असल्याचेही कंपनीने स्पष्टीकरण केले आहे. मात्र या अफवेमुळे भांडवली बाजारात गुरुवारी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचा समभाग ४ टक्क्य़ांनी गडगडला.

संपूर्ण व्हिडीओकॉन समूहाचे भारतीय बँकांना असलेले एकत्रित देणे हे २०,००० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे आणि ते ४५ ते ५० हजार कोटी रुपये नाही, असा खुलासा व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. भारतीय बँकांचे एकूण थकीत कर्ज हे २०,००० कोटी रुपयांचे, तर तितकेच कर्ज हे व्हिडीओकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीसाठी विदेशी बँकांकडून उभारले गेले आहे. या विदेशातील कंपनीची कामगिरी चांगली सुरू असून, विदेशी बँकांचे कर्ज थकण्याचा प्रश्न नाही आणि या कर्जाशी भारतातील बँकांचा संबंधही नाही, असा धूत यांनी खुलासा केला.

कंपनी कायदे लवादाकडे (एनसीएलटी) दिवाळखोरीची प्रक्रिया भारतीय बँकांकडून सुरू केले गेली आहे, परंतु त्याला मुंबई उच्च न्यायालयात आपण आव्हान दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँकांना कोणतीही तूट सोसावी न लागता त्यांचे संपूर्ण कर्ज फेडण्याची आपल्या समूहात क्षमता असल्याचा विश्वास धूत यांनी या मुलाखतीत व्यक्त केला.

आपल्या समूहाकडे अनेक चांगल्या मालमत्ता असून त्यांत खरेदीदारांना स्वारस्यही दिसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. व्हिडीओकॉन डीटीएचचे ‘डिश टीव्ही’शी विलीनीकरणाचे सर्व सोपस्कार पूर्ण होऊन आगामी चार-पाच दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल. शिवाय विमा व्यवसायातील भागीदारी कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली.

दरम्यान, कंपनीच्या कार्यालयांवर छापे आणि अध्यक्ष वेणुगोपाल धूत हे देशाबाहेर गेले असल्याच्या अफवांमुळे गुरुवारी भांडवली बाजारातील व्यवहारात व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचा समभाग जवळपास चार टक्क्य़ांनी गडगडला. यात कोणतेही तथ्य नसल्याचा कंपनीकडून त्वरेने खुलासा करण्यात आला. तरी राष्ट्रीय शेअर बाजारात बुधवारच्या तुलनेत ३.७७ टक्के घसरणीसह कंपनीचा समभाग १२.७५ रुपये पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.