वसुलीसाठी पाठपुरावा सुरूच राहील; अर्थमंत्र्यांचे राज्यसभेत स्पष्टीकरण

किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्या यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी केलेली नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी संसदेत केले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्याच दिवशी राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेमार्फत कर्जदारांना दिलेले सुमारे ७,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येत असून यामध्ये विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सलाही झुकते माप देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. किंगफिशर तसेच मल्या यांचे नाव न घेता अर्थमंत्र्यांनी त्यावर उत्तर देताना सांगितले की, बँकेने बुडीत कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) केलेली आहेत, याचा अर्थ ही कर्ज रक्कम माफ केली गेली असा नाही. उलट अशा कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करून ते वसूल करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, अशी जेटली यांनी स्पष्टोक्ती केली.

कर्ज निर्लेखित करणे म्हणजे कर्जमाफी नव्हे, असे स्पष्ट करत जेटली यांनी, बँकांनी दिलेले व अद्याप वसूल न झालेले कर्ज पुन्हा मिळविण्याचा बँकांचा प्रयत्न सुरू आहे, असे नमूद केले. कर्ज निर्लेखित करणे म्हणजे संबंधित कर्जदारांकडून अद्यापही कर्ज वसुलीला वाव असणे होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मल्या यांना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत कर्ज दिल्याचेही जेटली म्हणाले. काँग्रेस सरकारच्या कालावधीतच मल्या यांना दिलेल्या कर्जाची पुनर्रचना झाल्याचेही त्यांनी सांगितले. तेव्हा मल्या यांच्या कर्जरूपाने आपण एक अनोखा ‘वारसा’ जपल्याचे वक्तव्य जेटली यांनी यावेळी केले.

स्टेट बँकेसह विविध १७ बँकांचे जवळपास ७,००० कोटी रुपये कर्ज रक्कम थकविणारे विजय मल्या हे फेब्रुवारी २०१६ पासून भारताबाहेर आहेत.

सुब्बराव यांच्याकडून नोटबंदीचे स्वागत

सिंगापूर : सरकारच्या जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटबंदी निर्णयाचे रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी स्वागत केले आहे. चलन विमुद्रीकरणामुळे गुंतवणूक वाढून महागाईदेखील कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रोख रक्कमेऐवजी रोकडरहित व्यवहार करण्यास बँकांनाही आता ग्राहक, खातेदारांना उत्तेजित करावे, असे आवाहन त्यांनी केले. चलन व्यवस्थेत काळा पैसा पुन्हा येता कामा नये; त्याचबरोबर चलन व्यवस्थेकरिता ठोस उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

स्टेट बँकेकडून ७,००० कोटींची कर्जे निर्लेखित!

मुंबई: जुलै ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने सुमारे ६,०६० कोटी रुपयांचे कर्ज निर्लेखित (राइट-ऑफ) केली आहेत. यामध्ये विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या १,२०० कोटी रुपयांच्या कर्जाचाही समावेश आहे. स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनीही ६३ निर्ढावलेल्या कर्जदारांकडून (डिफॉल्टर्स) बुडित कर्ज रक्कम वसूल केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. स्टेट बँकेसह विविध १७ बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सला सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले असून, त्याची वसुली कैक वर्षांपासून थकली आहे.