संसदीय समितीची अनुकूलता

मद्यसम्राट आणि अपक्ष खासदार विजय मल्या यांची राज्यसभेतून हकालपट्टी करण्यास संसदेच्या समितीने अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे मल्या यांची हकालपट्टी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मल्या यांनी ९४०० कोटी रुपयांहून अधिक कर्ज बुडविले असल्याचे प्रकरण संसदीय समिती तपासून पाहात असून या समितीने हकालपट्टीच्या निर्णयाला अनुकूलता दर्शविली आहे.

राज्यसभेच्या नीतिमत्ता समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करणसिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मल्या यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी एक आठवडय़ांचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रियात्मक औपचारिकता असल्याचे समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे.

मल्या २ मार्च रोजी भारतातून ब्रिटनला गेले असल्याचे सांगण्यात येत आहे, सरकारने रविवारी त्यांचे पारपत्र रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्यांना मायदेशात परत आणण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याचे मानले जात आहे.

मल्या प्रकरणाचा आम्ही संपूर्ण अभ्यास केला आहे, बँकांकडून मागविण्यात आलेला सर्व दस्तऐवजही मिळाला आहे, मल्या यांची राज्यसभेतून हकालपट्टी करावी असा समितीमधील सर्व सदस्यांचे मत आहे, तरीही आम्ही मल्या यांना म्हणणे मांडण्यासाठी एक आठवडय़ाचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. समितीची पुढील बैठक ३ मे रोजी होणार असून त्या वेळी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे करणसिंग यांनी सांगितले.