‘नियमनविषयी शंकेचे निरसन होत नाही तोपर्यंत प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया नाही’

राष्ट्रीय भांडवली बाजार. देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार. बाजाराच्या १०,००० कोटी रुपयांच्या प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रियेची गुंतवणूकदार, भागधारक, हिस्सेदार आणि स्पर्धकांचीही प्रतिक्षा ताणली गेली आहे. मात्र बाजारमंचाभोवती गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला गैर प्रवृत्तींचा फेरा थांबायला तयार नाही.

अशा अवघड कालावधीत या बाजाराची अर्थात एनएसईची सूत्रे वित्त क्षेत्रातील आघाडीचे विक्रम लिमये यांनी सोमवार, १७ जुलैपासून स्विकारली. आयडीएफसी लिमिटेडमधील एक तपाचा व एकूण वित्त सेवेतील तीन दशकांचा अनुभव गाठीशी असलेले लिमये हे बाजारमंचाबाहेरील पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत.

‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत लिमये यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासह विश्वासार्हता निर्माण करण्यास आपले प्राधान्य असेल, असे सांगितले. बाजाराशी संबंधित यापूर्वी घडलेल्या व्यवहार, घटनांबाबत नियामकाला असलेल्या शंकांचे निरसन आपण जोपर्यंत पूर्णपणे करत नाही तोपर्यंत बहुप्रतिक्षित प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२०१५ मधील एका प्रसंगापासून सुरू झालेल्या राष्ट्रीय भांडवली बाजाराबाबतच्या चौकशीचा ससेमिरा संपत नाहीय. गेल्याच आठवडय़ात तांत्रिक अडचणींच्या माध्यमातूनही बाजाराला संकटाला सामोरे जावे लागले. तुम्ही या आव्हानांचा कसा सामना करणार?

बाजारात यापूर्वी घडलेल्या प्रकाराबाबत सर्वज्ञात आहे. या सर्वाबाबत नियामकाचे समाधान करणे याला माझे प्राधान्य आहे. त्यादिशेने काय पावले अथवा उपाययोजना करता येतील ते त्वरित केले जाईल.

एनएसईमध्ये सीईओ म्हणून तुमचा काय प्राधान्यक्रम असेल?

बाजार मंचाच्या व्यवहारात पारदर्शकता आणणे आणि गुंतवणूकदार, भागधारकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे याला माझे प्राधान्य असेल. बाजाराला त्याचे आंतरराष्ट्रीय स्थान पुन्हा मिळवून द्यावे लागेल. तसेच कर्मचारी, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करावे लागेल. बाजारासाठी संस्थात्मक उभारणी आवश्यक आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराची १०,००० कोटी रुपये उभारणीची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रियाही गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळली आहे..

अनेक कारणांमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया लाबत चालली आहे. याबाबत सर्व स्थिती पूर्वीप्रमाणे सुरळीत होत नाही; बाजार नियामकाला स्पष्टीकरणाचे समाधान होत नाही तोपर्यंत प्रक्रिया राबविता येणार नाही..

..किती वेळ लागेल?

नेमका कालावधी सांगता येणार नाही. म्हटले तर सहा महिने किंवा वर्षही. बाजाराबाबत नियमनविषयक आवश्यक कार्यवाही होत नाही तोपर्यंत तरी नाही. यासाठी आमची सेबीकडे नव्याने अर्ज करण्याचीही तयारी आहे.

एनएसईसारखीच जवळपास पाश्र्वभूमी तुम्ही जेव्हा आयडीएफसीचा कार्यभार हाती घेतला तेव्हा होती. पण हे क्षेत्र निराळे आहे आणि समस्याही. तुमचे निरिक्षण काय आहे?

आयडीएफसीची सूत्रे घेतली तेव्हा कंपनी पब्लिक लिमिटेड होत होती. निधी उभारणी व वित्त पुरवठय़ाचे आव्हान होते. कंपनीच्या भागधारकांचे हितही महत्त्वाचे होते. आयडीएफसीची स्वत:ची बँक असणे, स्पर्धक वित्त समूह ताब्यात घेणे हे महत्त्वाचे टप्पे म्हणता येतील. कारकिर्दीत गुंतवणूकदारांना दुहेरी अंकात परतावा व्यवसाय १० ते १५ पटीने वाढणे यातच सारे आले.

  • यशस्वी टप्पे : आयडीएफसीचा प्रायव्हेट ते पब्लिक लिमिटेड प्रवास, आयडीएफसी बँकेची स्थापना, श्रीराम समूहाबरोबरचे विलिनीकरण.
  • आव्हाने : बाजारातील यापूर्वीचे गैरप्रकार व संबंधितांवर कारवाई, १०,००० कोटी रुपयांची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया पार पाडणे.