दोन अंकी भरधाव अर्थवृद्धीचा घोषा सर्वत्र सुरू असताना, रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मात्र सबुरीचा सल्ला दिला आहे. वेगवान आर्थिक विकास हा नेहमीच अधिकाधिक कर्जबाजारीपणातून शक्य होतो, ज्याचे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विनाशकारी परिणामही संभवतात, असा त्यांनी इशारा दिला.

अर्थव्यवस्थेचा सुयोग्य दिशेने वाटचालीचा मार्ग सुनिश्चित करणे अधिक महत्त्वाचे आहे, तसे झाले तर तिला वाढीचे आंतरिक जादूई बळ आपोआपच मिळेल आणि अशा तऱ्हेने झालेला विकास हा अधिक शाश्वत स्वरूपाचा असेल, असे डॉ. आचार्य यांनी प्रतिपादन केले.

एशिया सोसायटीद्वारे आयोजित समारंभात बोलताना ते म्हणाले, ‘‘९ ते १० टक्के दराने अर्थवृद्धीचा टप्पा हा काही विशिष्ट मालमत्तांमध्ये कर्ज-आधारित निधीच्या पाठबळाने गाठला जातो. परंतु दुर्दैवाने अर्थव्यवस्थेची अशी वाढ चिरंतन नसते. लवकरच तिचा कडेलोट होतो आणि हे आपण येथे आणि भूतकाळात इतरत्रही अनुभवले आहे.’’

महागाई दराच्या नियंत्रणावर भर आणि कंपन्यांच्या तसेच बँकांच्या ताळेबंद पत्रक सुधारणेवर लक्ष केंद्रित करून रिझव्‍‌र्ह बँकेने अधिक शाश्वत स्वरूपाच्या पुढील तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी आर्थिक विकासासाठी मार्ग प्रशस्त केला आहे.

सातत्यपूर्ण गतिमान विकास सुकर व्हावा यासाठी बिघडलेला ताळेबंद आपण जर त्वरित आणि प्रभावी पद्धतीने दुरुस्त न केल्यास ती एक मोठी चूक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या महागाईलक्ष्यी धोरणाचेही डॉ. आचार्य यांनी समर्थन केले.

‘बँकांना तूट सोसावी लागणे अपरिहार्य’

दिवाळखोरीची संहिता हा कर्जबुडिताच्या समस्येच्या समाधानासाठी पडलेले मोठे पाऊल असल्याचे नमूद करून, आचार्य यांनी अल्पावधीत यातून क्लेशकारक परिणाम दिसून येतील, अशी कबुली दिली. ताळेबंदातील तीव्र स्वरूपाचे असंतुलन दूर करून ते ताळ्यावर आणताना बँकांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागणे स्वाभाविक दिसत आहे; थकीत कर्जातून निर्माण झालेले हे असंतुलन तूट सोसूनच दूर होईल, असे त्यांनी सूचित केले. गेल्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनीही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी वसुली रखडलेल्या मोठय़ा कर्ज रकमेवर पाणी सोडूनच या समस्येचे समाधान दिसून येते, असे मत व्यक्त केले होते. खासगी क्षेत्रातून भांडवली गुंतवणुकीला आकस्मिक चालना मिळेल, अशी अपेक्षा भाबडेपणाच ठरेल. मूळ समस्येच्या समाधानापश्चात खासगी गुंतवणुकीला बहर येईल, असा डॉ. आचार्य यांनी आशावाद व्यक्त केला.