विवो व्ही ५ एसमध्ये समूह सेल्फी तंत्रज्ञान विकसित

मोठय़ा समूहाची सेल्फी घेत असताना, अनेकदा उलटसुलट कसरती करूनही छायाचित्रात कुणाचा चेहराच दिसत नाही, तर कुणाच्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाशझोत नाही, अशा एक ना अनेक अडचणी जाणवतात. मात्र यापुढे समूह सेल्फीसाठी अशा कसरतींना विराम देईल असा स्मार्ट सांगाती विवोने गुरुवारी भारतीय बाजारात ‘विवो व्ही ५एस’ फोनच्या रूपात दाखल केला. २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये समूह सेल्फीसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे.

स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि संगीत या दोन गोष्टींचा अनोखा अनुभव देणाऱ्या विवोने सेल्फी कॅमेरा तंत्रज्ञानात आणखी एक भरारी घेतली आहे. कंपनीने बाजारात दाखल केलेला हा नवीन खास समूह सेल्फी छायाचित्र घेणाऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे. याशिवाय विवोने या फोनमध्ये व्ही ५ प्लसचे सर्व वैशिष्टय़े कायम राखली आहेत. फोनमध्ये कमीत कमी ६४ जीबी साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. हा फोन म्हणजे व्ही ५ आणि व्ही ५ प्लस या दोघांदरम्यानचा मध्यम किमतीचा फोन म्हणून ओळखला जाऊ शकतो. या फोनमध्ये विवोने फोर्स टच ओएस ३.० ही आवृत्ती दिली आहे. यामुळे फोन वापरण्यासाठी आवश्यक अनेक गोष्टी अधिक सुलभ झाल्या आहेत. याचबरोबर अ‍ॅपक्लोनची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅप वापरणे शक्य होणार आहे. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन या फोनमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे विवो इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी विवेक झांग यांनी सांगितले. हा फोन सोनेरी आणि मॅट ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर फोनसाठी पूर्वनोंदणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. यातील मॅट ब्लॅक रंगाचा फोन ६ मे रोजी, तर सोनेरी रंगाचा फोन २० मेपासून वितरणास उपलब्ध होणार आहे.

दुसऱ्या स्थानावर मुसंडी

अडीच ते तीन वर्षांपूर्वी भारतीय बाजारात दाखल झालेल्या विवोने स्थानिक स्मार्टफोन बाजारात मुसंडी घेत दुसऱ्या स्थानावर आपले नाव कोरले आहे. भारतीय बाजारात स्मार्टफोन विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये विवोचा हिस्सा दोन वर्षांपूर्वी दोन टक्के इतकाच होता. तो आता वाढून १५.४९ टक्के इतका झाल्याचे विवो इंडियाचे मुख्याधिकारी केंट चेंग यांनी स्पष्ट केले.

विवो व्ही ५ एस फोनची वैशिष्टय़े

  • ५.५ इंचाचा एचडी डिस्प्ले
  • २० मेगापिक्सेलचा फंट्र कॅमेरा. मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेल क्षमतेचा.
  • चार जीबी रॅम
  • ६४ जीबीअंतर्गत साठवण क्षमता
  • ३,००० एमएएच बॅटरी क्षमता
  • ऑक्टा कोर ६४ बिट प्रोसेसर
  • अवघ्या ०.२ सेकंदांमध्ये बोटाने फोन अनलॉक करण्याची सुविधा
  • मल्टी टास्क स्मार्ट स्क्रीन स्प्लिट
  • किंमत- १८,९९० रुपये