सरकारची कोटय़वधींचा थकीत महसूली देणी भागविण्याची टांगती तलवार असलेल्या देशातील आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपन्यांना दुसऱ्या तिमाहीत विक्रमी तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे. कर्जाचा भार असलेल्या व्होडाफोन- आयडियाने आजवर कोणाही भारतीय कंपनीने नोंदविला नसेल इतका म्हणजे  ५०,९२१ कोटी रुपयांचा तिमाही तोटा, तर व भारती एअरटेलला २३,०४५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

दोन्ही कंपन्यांची कट्टर स्पर्धक असलेली रिलायन्स जिओ सध्या ग्राहकसंख्येत अव्वल असून नफ्यातील कंपनी आहे. तर वाढता कर्जभार असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या सरकारी कंपन्यांचे  विलीनीकरण सध्या प्रगतिपथावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मागे थकीत महसुली हिस्सा (एजीआर) देण्याचा तगादा कायम आहे. त्यासाठी ताळेबंदात केलेल्या तरतुदीने तोटा आणखीच फुगला आहे.

व्होडाफोन आयडियाने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत वार्षिक तुलनेत तब्बल ४२ टक्के वाढ नोंदवीत ५०,९२१ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. कंपनीने ४४,१५० कोटी रुपयांच्या सरकारला चुकते करावयाच्या रकमेपोटी ताज्या ताळेबंदात २५,६८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानंतर आणखी ५४,१८४ कोटी रुपये व्होडाफोन आयडियाला द्यावे लागणार आहेत. तर भारती एअरटेलला ६२,१८७ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याकरिता कंपनीने दुसऱ्या तिमाहीच्या ताळेबंदात २८,४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जवळपास तेवढाच, २३,०४५ कोटी रुपयांचा तोटा कंपनीला सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत झाला आहे.

दरम्यान,‘एजीआर’संबंधी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार व्होडाफोन आयडियाने बोलून दाखविला आहे. तसेच हिस्सा विक्रीच्या माध्यमातून व्होडाफोन आयडियातून प्रमुख प्रवर्तक आदित्य बिर्ला समूह बाहेर पडण्याची चिन्हे आहेत. ‘एजीआर’पोटी दूरसंचार कंपन्यांना सरकारला एकत्रित १.४२ लाख कोटी रुपये द्यावयाचे आहेत.

समभागांची आपटी

थकीत महसुली हिस्सा सरकारला देण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध दूरसंचार कंपन्यांचे समभागमूल्य तब्बल २० टक्क्यांपर्यंत आपटले. यामध्ये सर्वाधिक फटका व्होडाफोन आयडियाला बसला. कंपनीचा समभाग गुरुवारअखेर २.९५ रुपयांवर येऊन ठेपला. परिणामी बाजार भांडवल एकाच दिवसात २,१५५.०६ कोटी रुपयांनी रोडावले. तर भारती एअरटेलचा समभाग दिवसअखेर १.५९ टक्क्यांनी घसरून ३६२.६५ रुपयांवर येऊन ठेपला.