अन्य दूरसंचार कंपन्यांबाबत उघड भेदभावाचा व्होडाफोनच्या मुख्याधिकाऱ्यांचा आरोप

वृत्तसंस्था, बार्सिलोना

ब्रिटनची आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोनने भारतातील नियमन बदल हे गेल्या दोन वर्षांत केवळ रिलायन्स जिओसाठी लाभकारक ठरले असून, अन्य दूरसंचार कंपन्यांना मात्र नियमांच्या प्रतिकूलतेचा जबर जाच सोसावा लागला आहे, असा सणसणीत आरोप केला आहे. व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड यांनी सोमवारी येथे तो जाहीरपणे केला.

व्होडाफोनची सेवा सध्या भारतात आदित्य बिर्ला समूहातील आयडिया लिमिटेडबरोबरच्या भागीदारीतील कंपनीद्वारे दिल्या जात असून, ग्राहकसंख्येच्या बाबतीत ती क्रमांक एकची सेवा आहे.

रिलायन्स जिओला झुकते माप दिले गेले आणि नियमनांतील बदल हे त्यांच्यासाठी केले गेले, असे स्पष्टपणे नमूद करीत, ‘आम्ही दूरसंचार नियामकांकडे सर्वाना समान वागणूक मिळेल अशा नियमांची मागणी करीत होतो. परंतु गेल्या दोन वर्षांत मात्र उलटेच घडत आले आणि जिओवगळता अन्य सर्वासाठी नियमनातील बदल अधिकाधिक कठोर बनत गेला,’ असे रीड म्हणाले. भारतातील नियामक आणि धोरण व्यवस्थेच्या जाचाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ही टिप्पणी केली.

भारतातील कंपनीचा व्यवसाय गेली दोन वर्षे खडतर परिस्थितीतून वाटचाल करीत होता अशी प्राजंळ कबुली देत असतानाच, नजीकच्या काळात नवीन नेटवर्क विस्तारासाठी गुंतवणूक आणि काही मालमत्तांच्या चलनीकरणातून नव्याने मुसंडीसाठी कंपनीने सज्जता केली आहे, असेही रीड यांनी स्पष्ट केले.

भारतातील विद्यमान मोबाइल सेवांसाठी दररचना ही निम्नतम पातळीवर असून, ते फार काळ त्या पातळीवर टिकणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.