सप्टेंबरअखेर ‘जिओ’धारक ३५.५२ कोटींवर

सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत विक्रमी तोटय़ाची नोंद करणाऱ्या आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपन्यांना रोडावत्या ग्राहकसंख्येलाही सामोरे जावे लागले आहे. व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेलने एकत्रितरीत्या सप्टेंबरमध्ये ४९ लाख मोबाइलधारक ग्राहक गमावले आहेत; तर रिलायन्स जिओच्या ग्राहकसंख्येत याच दरम्यान ६९.८३ लाखांची भर पडली आहे.

दूरसंचार नियामकाच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या सप्टेंबरमध्ये एकूण मोबाइलधारकांची संख्या ११७.३७ कोटी झाली असून त्यात महिनागणिक ०.२३ टक्के भर पडली आहे. शहरी भागात ग्राहकसंख्येत घसरण होऊन ती ६५.९१ कोटी अशी असून ग्रामीण भागातील दूरसंचार ग्राहकांची संख्या वाढीसह ५१.४५ कोटींवर पोहोचली आहे.

यंदाच्या सप्टेंबरमध्ये व्होडाफोन आयडियाचे ग्राहक २५.७० लाखांनी कमी होऊन त्यांची संख्या ३७.२४ कोटी झाली आहे. तर भारती एअरटेलने सप्टेंबरमध्ये २३.८० लाख ग्राहक गमावत एकूण ३२.५५ कोटी ग्राहकसंख्या नोंदविली आहे. रिलायन्स जिओला ६९.८३ लाख नवीन ग्राहक मिळून, सप्टेंबरअखेर तिच्या मोबाइलधारकांची संख्या ३५.५२ कोटींवर गेली आहे.

देशातील दूरसंचार क्षेत्रात व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ व भारती एअरटेलचा बाजारहिस्सा अनुक्रमे ३१.७३, ३०.२६ व २७.७४ टक्के आहे. सार्वजनिक क्षेत्रातील व विलीनीकरणाच्या प्रक्रियेतील एमटीएनएल व बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत  सप्टेंबरमध्ये संमिश्र हालचाल नोंदली गेली आहे.

‘आरकॉम’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी आज बैठक

मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशन्सला (आरकॉम) कर्ज देणाऱ्या बँका, वित्तदारांची समिती बुधवारी (२० नोव्हेंबर) कंपनीच्या नादारी व दिवाळखोरी प्रक्रियेकरिता बैठक घेणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. गेल्याच आठवडय़ात कंपनीच्या अध्यक्षपदाचा अनिल अंबानी यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर कंपनीचे वित्तीय अधिकारी व चार संचालकही पायउतार झाले आहेत. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत रिलायन्स कम्युनिकेशन्सने ३०,१४२ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. व्होडाफोन आयडियानंतर सर्वाधिक तोटा नोंदविणारी रिलायन्स कम्युनिकेशन्स ही भारतातील दुसरी मोठी खासगी कंपनी ठरली आहे.