देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. परंतु आता हळूहळू अनलॉक अंतर्गत देशातील सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. करोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी, वेतन कपात तसंच पगारवाढ नाकारली होती. परंतु व्होडाफोन आयडिया या कंपनीनं मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना अधिक वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळात कंपनीचे अनेक कर्मचारी सोडून जात आहेत. सध्यादेखील हीच परिस्थिती कायम आहे. वरिष्ठ पदांवरील कर्मचारीदेखील कंपनीला सोडचिठ्ठी देत आहेत. अशातच कर्मचाऱ्यांना थांबवण्यासाठी कंपनीनं नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त कंपनीनं कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर अवनिश खोसला यांना पदोन्नती गेत चीफ मार्केटिंग ऑफिसर केलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिक्तच होतं.

अतिरिक्त वेतनासोबत कंपनीनं कर्मचाऱ्यांना एक अटही घातली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनाचा लाभ मिळणार आहे त्या कर्मचाऱ्यांना ३१ मार्च २०२१ पर्यंत कंपनीसोबत राहावं लागणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं ही अट पाळली नाही तर त्या कर्मचाऱ्याच्या अंतिम वेतनातून ही रक्कम कापली जाणार आहे.

व्होडाफोन आयडिया ही कंपनी सध्या मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. सध्या कंपनीला मोठ्या प्रमाणात एजीआरची रक्कमही फेडायची आहे. याव्यरिक्त खराब नेटवर्कचाही सामना करावा लागत असल्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्याही कमी होत आहे. दुसरीकडे कंपनी मोठ्या प्रमाणात निधी जमवण्याचेही प्रयत्न करत आहे. परंतु यातही कंपनीला अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही. अशा परिस्थितीत गेल्या काही महिन्यांपासून कंपनीतील कर्मचारीही साथ सोडून जात असल्यानं कंपनीसमोरील समस्य़ाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.