एकेकाळी ग्राहकसंख्येत अव्वल राहिलेल्या व्होडाफोन आयडियाचे नामांतर व्हीआय असे झाले असून यानिमित्ताने प्रवर्तक आदित्य बिर्ला समूहाने नवी नाममुद्राही जारी केली आहे.

व्होडाफोन आयडिया लिमिटेड आता व्हीआय लिमिटेड झाली असून कंपनीच्या नावाचा उच्चार वुई असा असेल, असे स्पष्ट करण्यात आले. याबाबतची घोषणा सोमवारी कंपनीने दृक्-श्राव्य पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

नव्या नाममुद्रेच्या माध्यमातून कंपनी पुन्हा ग्राहक मिळविण्यात तसेच दूरसंचार क्षेत्रातील बाजारहिस्सा मिळविण्यात यशस्वी होईल, असा विश्वास यानिमित्ताने व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंदर ठक्कर यांनी व्यक्त केला. देशातील १०० कोटी भारतीयांना ४जी तंत्रज्ञानावर आधारित सेवा देण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचेही नमूद करण्यात आले.

व्होडाफोनच्या मूळ ब्रिटनच्या प्रवर्तकांनी भारतातील दूरसंचार व्यवसायातून निर्गमन के ल्यानंतर आयडियाने हा व्यवसाय दोन वर्षांपूर्वी खरेदी के ला. आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलरची त्यापूर्वीपासून दूरसंचार सेवा सुरू होती. भांडवली बाजारात सूचिबद्ध आयडिया सेल्युलरचे परिणामी व्होडाफोन आयडिया लिमिटेड असे नामांतर होऊन कं पनी ग्राहकसंख्येत देशातील अव्वल कंपनी बनली. विलीनीकरणापूर्वी अस्तित्वात आलेल्या रिलायन्स जिओने देशातील दूरसंचार स्पर्धा तीव्र करत व्होडाफोन आयडियाचे ग्राहकसंख्येबाबतचे अव्वल स्थानही हिरावले.

कंपनीचा प्रति ग्राहक सरासरी महसूल (आरपू) १५ ते २० टक्के असेल, असे मॉर्गन स्टॅनलेने आपल्या अहवालात म्हटले आहे. कंपनीला नजीकच्या भविष्यात २२,००० कोटी रुपये व्यवसायासाठी लागतील, असेही नमूद केले आहे.

व्होडाफोन आयडिया

१२.३०  +२.४१%

मोबाइल  कॉल दर वाढणार

नफा आणि उत्पन्न मिळविण्यासाठी मोबाइल कॉलचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे व्होडाफोन आयडिया लिमिटेडने सोमवारी स्पष्ट केले. दूरसंचार कंपन्यांच्या थकीत देणी फेडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मोठा भार कंपनीवर आहे. न्यायालयाने याबाबत १० वर्षांचा अवधी दिला असला तरी सुस्थितीतील व्यवसायासाठी दरवाढ अटळ आहे, असे नमूद करण्यात आले. कंपनी किमान २०० रुपयांची दरयोजना ठेवण्याची शक्यता आहे. व्होडाफोन आयडियाला थकीत महसुलापाटी ५०,००० कोटी रुपये देणे आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात काही रक्कम सरकारदरबारी जमा केली आहे. तसेच एकूण २५,००० कोटी रुपये उभारणीची योजनाही आखली आहे.