मागच्या काही काळापासून रिलायन्स जिओ वगळता मोबाइल दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या अन्य कंपन्या नुकसानीचा सामना करत आहेत. ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याच्या स्पर्धेमुळे दूरसंचार क्षेत्र आज संकटात आहे. या पार्श्वभूमीवर व्होडाफोन आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी मोठं विधान केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडीयाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर सरकारकडे जमा करावा लागणार आहे. यामध्ये सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर, व्होडाफोन आयडीयाला व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटले आहे.

व्होडाफोन आयडीया मोबाइल दूरसंचार सेवा क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी आहे. “जर आम्हाला मदत मिळाली नाही तर, व्होडाफोन आयडियाला व्यवसाय गुंडाळावा लागेल” असे कुमार मंगलम बिर्ला हिंदुस्थान टाइम्सच्या कार्यक्रमात म्हणाले.

५३,०३८ कोटी रुपयाची देणी सरकारकडे जमा करायची आहेत. त्यावर केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत व्होडाफोन आयडियाला कोणाताही दिलासा मिळालेला नाही.