जर्मनीची फोक्सवॅगन कंपनी जगात मोटार उत्पादनात आघाडीवर आहे. काही उत्पादनांची विश्वासार्हता इतकी मोठी असते, की लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण अमेरिकेतील पश्चिम व्हर्जिनियातील करडय़ा केसांच्या, निळी जीन पँट घालणाऱ्या डॅनियल कार्डर या अभियंत्याने सर्वाचे डोळे उघडले आहेत. फोक्सव्ॉगन कंपनीच्या मोटारी प्रदूषण चाचणीला हुलकावणी देत होत्या व तसे सॉफ्टवेअर त्या गाडय़ांमध्ये वापरले होते, असे या अभियंत्याने संशोधनातून दाखवून दिले. इतर कंपन्यांच्या गाडय़ांची तपासणीही त्यांनी केली पण त्यांच्यात दोष आढळला नाही. या संशोधनासाठी ५० हजार डॉलर्स खर्च आला. फोक्स व्ॉगनच्या ७८ वर्षांच्या इतिहासात प्रतिमाभंग करणारा असा कुठलाच पेचप्रसंग आला नव्हता.

१५ ते ३५ पट जास्त विषारी वायू
कार्डर व त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी फोक्सव्ॉगनच्या मोटारींचाच नव्हे तर इतर कंपन्यांच्या मोटारींचाही अभ्यास केला होता. त्यात फोक्सव्ॉगनच्या गाडय़ांमध्ये काहीतरी गडबड लक्षात आली. लॉसएंजल्स, वेस्ट कोस्ट ते सियाटल अशा अनेक ठिकाणी या वाहनांच्या चाचण्या झाल्या. त्यात या गाडय़ा १५ ते ३५ पट जास्त कार्बन व इतर वायू बाहेर टाकीत असल्याचे दिसून आले. अनेकदा युरो १-२-३ असे निकष प्रदूषण नियंत्रणासाठी तयार केले जातात, ते आपण पाळत आहोत हे दाखवण्यासाठी मोटार कंपन्या प्रदूषण चाचणी यंत्रांना हुलकावणी देतात असे दिसून आल्याने हे सगळे किती गांभीर्याने चालते यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
या गाडय़ांबाबतचे हे निष्कर्ष खरेतर दीडवर्षांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते मग आताच त्यावरून वादंग का माजवण्यात आले, हा एक प्रश्न यात आहे पण तरीही त्याचे महत्त्व कमी होत नाही. फोक्सव्ॉगनच्या गाडय़ा प्रदूषण नियंत्रण चाचणीच्या ठिकाणी नेल्या तर कमी उत्सर्जन दाखवत होत्या व चाचणी संपली की इतरवेळी भरपूर कार्बन व इतर विषारी वायू ओकत होत्या. अर्थात तशा प्रकारचे बनवेगिरी करणारे सॉफ्टवेअर त्यात होते हे उघड आहे. २००९ पासून अमेरिकेतील फोक्सव्ॉगन वाहनात हे सॉफ्टवेअर बसवून ४८२००० डिझेल गाडय़ा प्रदूषण विरहित असल्याचा दावा करून विकण्यात आल्या.
जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला फटका?
दोनच दिवसांपूर्वी पर्यावरण संरक्षण संस्थेने फोक्सव्ॉगन संस्थेने स्वच्छ हवा कायद्याचे उल्लंघन केल्याचे जाहीर केले. त्यात गोल्फ, जेट्टा, बिटल, पसाट या वाहनांचा समावेश आहे. आता कंपनीला १८ अब्ज डॉलर्स इतका मोठा दंड होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यामुळे फोक्सव्ॉगनचा शेअर ३० टक्क्य़ांनी घसरला. जगात जी ११० दशलक्ष वाहने विकली गेली त्यात बनवेगिरी करणारे सॉफ्टवेअर असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विंटरकोर्न यांनी माफी मागितल्यानंतर उशिरा राजीनामा दिला. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी कंपनीला ताबडतोब उपाययोजना करण्यास सांगितले आहे. कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. पेचप्रसंगांसाठी कंपनीने ६.५ अब्ज युरो बाजूला काढून ठेवलेले आहेत. यापूर्वी कॅटरपीलर व व्हाल्वो कंपन्यांचे पितळही १९९८ मध्ये उघडे पडले होते. अमेरिकी बाजारपेठेत पाय रोवत असताना फोक्सव्ॉगनला हा मोठा हादरा आहे.
संकलन : राजेंद्र येवलेकर
फोक्सव्ॉगन कुठे?
मोटार विक्रीत क्रमांक एकची कंपनी
नफ्यात अग्रभागी नाही
शेअर तीस टक्क्य़ांनी घसरला
११ दशलक्ष वाहने सदोष
१८ अब्ज डॉलर दंड शक्य
कंपनीचा अशा प्रकरणांसाठी राखीव निधी ६.५ अब्ज ब्युरो