आलिशान आणि महागडय़ा भारतीय मोटारींच्या स्पर्धेत आता स्विडनची व्होल्वोही उतरू पाहत आहे. तूर्त आयात करण्यात येणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांची निर्मिती लवकरच देशात करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. यासाठी कंपनी गुजरातलाच प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
२०२० पर्यंत दुप्पट जागतिक विक्री नोंदविण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये वाहन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या विचारात कंपनी असल्याचे ‘व्होल्वो ऑटो इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक थॉमस एर्नबर्ग यांनी गुरुवारी अहमदाबाद येथे सांगितले. कंपनीच्या देशातील ११ व्या विक्री दालनाचे उद्घाटन त्यांनी शहरात केले. २०१३ मध्ये दालनांची संख्या आणखी दोनने वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. दीड महिन्याभरापूर्वी पॅरिसच्या वाहन प्रदर्शनात सादर केलेले व्होल्वो व्ही-४० हे वाहन येत्या एप्रिलपर्यंत भारतातही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
व्होल्वोची एक्ससी९०, एक्ससी६०, एस८० आणि एस६० ही आलिशान प्रवासी वाहने सध्या भारतात आयातीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आयातीचा खर्च वाढत असल्याने कंपनीच्या सध्याच्या वाहनांच्या किंमतीही नव्या वर्षांपासून ५ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहेत.
२०२० पर्यंत भारताची आलिशान मोटारींची भारतीय बाजारपेठ १,५०,००० होण्याची शक्यता असून त्यात व्होल्वो १५ टक्के हिस्सा राखण्याच्या मनिषेसह तयारी करत आहे. देशात वर्षभरात २८,००० महागडी प्रवासी वाहने विकली गेली आहेत. या क्षेत्रात सध्या जर्मनीच्या मर्सिडिज, ऑडी आणि बीएमडब्ल्यूची क्रमांक एकसाठी रस्सीखेच सुरू आहे. व्होल्वोनेही गेल्या वर्षांत ३२० आलिशान कार विकल्या आहेत.