किरकोळ विक्री दालन साखळीसाठी गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेली बलाढय़ अमेरिकी कंपनी वॉलमार्ट आणि भारती एंटरप्राईजेसमधील भागीदारी अखेर बुधवारी संपुष्टात आली. थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारण्यात आलेल्या या क्षेत्रात आता उभय कंपन्यांनी स्वतंत्र वाटचाल करण्याचे ठरविले आहे.
अमेरिकेच्या वॉलमार्टने सुनील भारती मित्तल यांच्या भारती एंटरप्राईजेसबरोबर २००७ मध्ये भारतीय रिटेल क्षेत्रात भागीदारी जाहीर केली होती. याअंतर्गत देशभरात किरकोळ विक्री दालनांचे जाळे उभारण्याचा करार करण्यात आला होता. ‘बेस्ट प्राइस’ या नाममुद्रेखाली उभयतांमार्फत ५०:५० टक्के भागीदारीसह देशभरात २० दालनेही चालविली जात आहेत. तर ‘इझीडे’ ही नाममुद्राही याच क्षेत्रात या भारतीमार्फत सुरू असून तिची देशभरात २१२ दालने सुरू आहेत. वॉलमार्ट-भारतीचे पहिले ‘बेस्ट प्राइस’ दालन मे २००९मध्ये अमृतसर येथे सुरू झाले होते.
भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या वादग्रस्त मुद्दय़ावरून तसेच व्यवसायातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अमेरिकेतील वॉलमार्ट गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. या क्षेत्रातून आपण बाहेर पडण्याचे संकेतही तिने दिले होते. आता अधिकृत घोषणेनंतर भागीदारीतील व्यवसाय भारती ताब्यात घेणार असून वॉलमार्टमार्फत गुंतविण्यात आलेल्या सेडर सपोर्ट सव्‍‌र्हिसेस कंपनीच्या १० कोटी डॉलरचे परिवर्तनीय रोख्यांवर भारतीचे वर्चस्व येईल.
देशभरातील २१२ ‘इझीडे’ दालने भारतीद्वारेच चालविली जातील, असे भारती एंटरप्राईजेसचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन मित्तल यांनी सांगितले. तर वॉलमार्टच्या आशिया विभागाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट प्राइस यांनी आम्ही आता स्वतंत्ररीत्या भारतीय रिटेल क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सेडर सपोर्ट सव्‍‌र्हिसेस कंपनीतील वॉलमार्टची ४५५.८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरून सध्या अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी सुरू आहे.
‘बेस्ट प्राइस’चा दिवस मावळला
मे २००९ मध्ये अमृतसर येथे पहिल्या ‘बेस्ट प्राइस’ दालनापासून सुरू झालेली भारती-वालमार्ट ही ५०:५० टक्के भागीदारी देशभरात २० दालनांपर्यंत विस्तारावर येऊन विसावली. भारतीची एकाच वेळी ‘इझीडे’मार्फत स्वतंत्र चूल मांडणे सुरूच होते. वॉलमार्टबरोबर भागीदारी फिस्कटली असली तरी देशभरात २१२ दालने असलेल्या ‘इझीडे’द्वारे या क्षेत्रातील स्वारस्य कायम असल्याचे भारतीने स्पष्ट केले आहे.
वॉलमार्टचे राज जैन ‘भारती’च्या सेवेत
वॉलमार्टबरोबर काडीमोड झाल्यानंतर भारती एंटरप्राईजेसने या क्षेत्रात स्वतंत्र वाटचाल करण्याचे मनसुबे रचतानाच भागीदार कंपनीचे भारतातील प्रमुख राज जैन यांच्याकडे समूह सल्लागार ही नवी जबाबदारी सोपविली आहे. वॉलमार्ट-भारती व्यवसायावर गेल्या वर्षी भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडल्यानंतर याच जैन यांनी घरी जावे लागले होते. त्यांच्याबरोबर पाच वरिष्ठ अधिकारी २०१२ मध्ये निलंबित झाले होते. पैकी कालिन मुख्य वित्तीय अधिकारी पंकज मदान यांनाही भारतीने नुकतीच दूरसंचार कंपनीच्या (भारती एअरटेल) जागतिक स्तरावरील वित्तीय विभागात सामावून घेतले.