वॉलमार्टने २०२७ पर्यंत भारतातून निर्यात केले जाणाऱ्या मालाचे प्रमाण तिपटीने वाढवून १० अब्ज डॉलपर्यंत नेण्याची घोषणा गुरुवारी केली. वॉलमार्टच्या या नव्या निर्यात बांधिलकीमुळे भारतातील सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) लक्षणीय प्रमाणात चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

‘मेक इन इंडिया’ उत्पादने जागतिक करण्यात भारतीय कंपन्यांना साहाय्य करण्यासाठी गुंतवणूक केल्याबद्दल वॉलमार्टचे कौतुक वाटते, असे फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले.

वॉलमार्टचे अध्यक्ष डाऊ मॅकमिलन म्हणाल ेकी, येत्या काळात भारतातील आमच्या निर्यातीत लक्षणीय वाढ करून आम्ही ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला हातभार लावत आहोत आणि अधिकाधिक स्थानिक व्यवसायांना आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास साहाय्य करत आहोत. भारतीय बनावटीची उत्पादने जगभरातील ग्राहकांपर्यंत नेण्याचा हा मार्ग आहे.

वॉलमार्टसाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. २००२ मध्ये बंगळुरुमध्ये सुरू झालेल्या वॉलमार्टच्या ‘ग्लोबल सोर्सिग’ कार्यालयातून कार्यचलन पाहिले जाते.

भारतातील वार्षिक निर्यात ३ अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतीय बनावटीचे कपडे, होमवेअर, दागिने, हार्डलाइन्स आणि इतर लोकप्रिय उत्पादने जवळपास १४ बाजारपेठांमधील ग्राहकांपर्यंत पोहोचतात. यात अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांचा समावेश आहे.