राज्यातील औद्योगिक पट्टय़ांमध्ये असलेल्या उद्योगांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या दरांमध्ये थेट ३० टक्क्यांपर्यंतची कपात करण्याची घोषणा महाराष्ट्राचे नवनियुक्त उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी केली. कमी करण्यात आलेल्या दरांची अंमलबजावणी १ डिसेंबर २०१४ पासून होणार आहे.
राज्याचे नवे उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा घेतला. महामंडळाच्या उपनगरातील मुख्यालयात झालेल्या बैठकीला या वेळी अध्यक्ष भूषण गगराणी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अंबलगन व आनंद रायते हे उपस्थित होते.
राज्याच्या उद्योग खात्यांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत मोठय़ा प्रमाणात उद्योग कार्यरत आहेत. अशा उद्योगांच्या पाणीदरांमध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंतची कपात करण्यात येणार आहे.
औद्योगिक दरांऐवजी वाणिज्यिक दरांच्या आधारावर महामंडळाच्या जागेवरील औद्योगिक पट्टय़ातील उद्योगांच्या वीज दरांमध्ये वाढ झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी पाणी दरही वाढविण्यात आले होते. हे दर कमी करण्यासाठी महामंडळाने राज्य विद्युत नियामक आयोगाकडे याचिकाही केली होती. राज्य विद्युत वितरण महामंडळाने सवलतीच्या दरात विद्युत पुरवठय़ाची तयारी दाखविल्याने आयोगानेही ऑगस्टमध्ये तसे आदेश दिले होते. यामुळे उद्योगांना आता कमी दरात पाणीपुरवठा करणेही शक्य होणार आहे.
जागा मिळण्याची प्रक्रियाही गतिमान!
उद्योगांना जारी करावयाच्या जागेबाबत नवीन समिती नेमून विभागीय पातळीवर १० दिवसांत, तर मुख्यालय स्तरावर १५ दिवसांत  निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेवरही उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. जागेबाबतच्या मंजुरी प्रक्रियेची ताजी स्थिती उद्योगांना आता महामंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच येत्या डिसेंबरपासून जागेच्या मागणीसाठी केलेल्या अर्जाबाबतचा प्रतिसाद उद्योगांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून पाहता येईल.