आयुर्विमा योजना खरेदी करणे तसे सोपे आहे. गेली काही वर्षे तुम्हाला याच्या नेमके उलट सांगण्यात आलेले असेल, पण आयुर्विमा घेणे तितके गुंतागुंतीचे नक्कीच नाही. आजवर थर्ड पार्टी सल्लागाराशी सल्लामसलत करून भारतीय आयुर्विमा योजना खरेदी करत आले आहेत. योग्य योजना खरेदी करण्यासाठी त्याची मदत घेण्याइतका विश्वास भारतीयांचा या सल्लागारांवर असतो.

परंतु, गेल्या काही वर्षांत आयुर्विमा खरेदी करण्याच्या पद्धतींमध्ये बदल झाले आहेत. ग्राहक स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यासाठी आज अधिक सक्षम व माहीतगार असतात. तरीही, त्यांच्यासाठी कोणता निर्णय योग्य आहे हे विचारण्यासाठी ते आजही इतरांवर अवलंबून का आहेत?

‘स्विस री’च्या २०१५ मधील संशोधनानुसार, पुरेसे विमाकवच नसलेले भारतामध्ये तब्बल ९२ टक्के जण आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर, एका व्यक्तीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येकी १०० रुपयांच्या विम्यापैकी त्यांच्याकडे केवळ ८ रुपयांचा विमा आहे. वास्तविक, आशियायी देशांचा विचार करता, पुरेशा प्रमाणात विमाकवच नसण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे.

आपल्या प्रियजनांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आयुर्विमा योजना घेणे महत्त्वाचे आहे, यात शंकाच नाही. इतका महत्त्वाचा निर्णय अन्य कुणावर तरी सोपवू नये. हा दृष्टिकोन अवलंबून स्वत:ला एक प्रश्न विचारा, ‘आयुर्विमा योजना खरेदी करण्याचा निर्णय माझा मी घेणे सर्वोत्तम ठरणार नाही का?’

आयुर्विमा योजनेचा निर्णय घेण्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. स्वत:चा सल्लागार स्वत: बनण्यास मदत होण्यासाठी पुढील बाबी उपयुक्त ठरतील :

उद्दिष्टानुसार खरेदी करा :

बरेचसे योजनाधारक बचत करण्यासाठी किंवा कर वाचवण्यासाठी आयुर्विमा योजना खरेदी करतात. या उत्पादनाच्या मूलभूत उद्दिष्टाकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. आयुर्विमा हे पहिले व अग्रेसर संरक्षण उत्पादन आहे, हे लक्षात घ्यायला हवे. चुकीच्या उद्देशाने आयुर्विमा योजना खरेदी केल्यामुळे अनेक व्यक्तींनी पुरेसे विमाकवच घेतलेले नसते. त्यामुळे तुम्हाला हवे आहे यापूर्वी, तुम्हाला काय साध्य करायचे आहे याचा विचार करा.

आर्थिक स्थितीचा आढावा घ्या :

तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली जावी म्हणून तुम्ही आयुर्विमा योजना खरेदी करत आहात हे विचारात घेता, तुम्ही तुमची आर्थिक स्थिती लक्षात घ्यायला हवी. कारण, याचा परिणाम भविष्यात तुमच्या प्रियजनांवर होणार असतो. तुमचे सध्याचे उत्पन्न, जबाबदारी आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणासह तुमच्या जीवनातील विविध टप्पे असे पैलू यांचा आढावा घ्या. तुमच्या खर्चामध्ये जीवनशैलीचा भागही कारणीभूत असल्याने याबाबतीत जीवनशैली हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. योग्य रकमेचे विमाकवच, योग्य प्रकारची विमा योजना व त्याचा कालावधी ठरवण्यासाठी तुम्हाला यामुळे मदत होईल.

योग्य विमा कंपनी निवडा :

तुम्ही जी विमा कंपनी निवडाल ती पुढील अनेक वर्षे तुम्हाला संरक्षण देणार आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही योजना खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही संबंधित विमा कंपनी जाणून घेण्यासाठी सर्वतोपरी विचार करणे गरजेचे आहे. पुढील काही प्रमुख निर्देशांकांकडे विशेष लक्ष द्यावे –

दावा निकाली प्रमाण : विमा कंपनीने पूर्ण केलेल्या दाव्यांची संख्या यातून दिसून येते. लाभार्थ्यांना पैसे देणे व कठीण काळात त्यांना पाठिंबा देणे हे विमा कंपन्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते.

ग्राहक सेवा : विमा कंपनीच्या सध्याच्या ग्राहकांचे कंपनीविषयी काय मत आहे, याचा आढावा घ्या. कंपनी आपल्या ग्राहकांना कशी वागणूक देते व त्यांच्या तक्रारी कशा हाताळते हा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे.

विम्याची रक्कम व योजनेचा कालावधी ठरवा : विविध योजनांविषयी माहिती घ्या. सूचक माहितीचा तुम्हाला पाठपुरावा करायचा असल्यास दोन प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा :

विम्याची रक्कम : माझ्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी मी कोणते आयुर्विमा कवच खरेदी करणे गरजेचे आहे (तुमच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा साधारणत: ८ ते १० पट)

योजनेचा कालावधी : माझ्या कोणत्या वयापर्यंत योजनेने मला संरक्षण द्यावे अशी अपेक्षा आहे? आता, बहुतांश मुदत योजना वयाच्या ८० वर्षांपर्यंत संरक्षण देतात.

शुल्क आढावाकालावधी :

तुमच्या गरजांना साजेशी योजना तुम्ही निवडल्यानंतर व खरेदी केल्यानंतर तुम्हाला शुल्क आढावा कालावधी नावाचा एक पर्याय असतो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला योजनेचा फेरविचार करायचा असल्यास योजना खरेदी केल्यापासून शुल्क हे आढावा कालावधीदरम्यान १५ दिवसांच्या आत ती तुम्ही परत करू शकता.

योग्य योजना निवडा

आर्थिक स्थितीचा आढावा आणि निर्धारीत आर्थिक उद्दिेष्टे या  मुद्दय़ांच्या आधारे तुम्ही कोणते उत्पादन घ्यायचे ते निश्चित केल्यानंतर संबंधित योजना पूर्णपणे समजून घ्या. उत्पादन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही स्वत:ला पुढील प्रश्न विचारावेत :

  • या योजनेत काय समाविष्ट आहे व काय वगळलेले आहे?
  • कोणत्या घटकांमुळे प्रीमिअमचा खर्च वाढतो/घटतो?
  • तुम्ही किंवा कंपनी योजना रद्द केव्हा करू शकता व त्यासाठी काही दंड आहे का?
  • तुम्हाला लाभार्थी बदलता येऊ शकतो का?
  • योजना परावर्तित किंवा पुनर्नूतनीकरणाची आहे का?
  • पुनर्नूतनीकरणासाठी अटी कोणत्या आहेत?

– मर्तिज डी जाँग

(लेखक एगॉन लाइफ इन्शुरन्सचे मुख्य डिजिटल अधिकारी आहेत.)