अमेरिकेत रविवारपासून ‘वुई चॅट’ या चिनी उपयोजनावर (अ‍ॅप)  बंदी घालण्यात आली आहे. ‘वुई चॅट’ हे ‘व्हॉटसअ‍ॅप’ सारखेच चिनी उपयोजन असून त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. याशिवाय टिकटॉक या उपयोजनावर १२ नोव्हेंबरपासून बंदी लागू करण्यात येणार आहे .

अमेरिकेचे व्यापार मंत्री विल्बर रॉस यांनी स्पष्ट केले की, जर टिकटॉकमध्ये काही सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या तर त्याचा वापर शक्य आहे अन्यथा नाही. चीनच्या या उपयोजनांनी अमेरिकी नागरिकांची व्यक्तिगत माहिती चोरली असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकी राष्ट्रीय मूल्ये व लोकशाही संकेत तसेच कायदा-नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली असून ट्रम्प प्रशासनाने ऑगस्टपासूनच, अमेरिकी नागरिकांची माहिती चोरण्याच्या  चीनच्या कृत्यांविरोधात कारवाई करीत असल्याचे जाहीर केले होते.

टिकटॉक हे उपयोजन बाइट डान्स लि. या चिनी कंपनीच्या मालकीचे असून त्यांच्याकडे अमेरिकेतील १० कोटी लोकांची व्यक्तिगत माहिती असल्याने त्यापासून सुरक्षेला धोका आहे असे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे. भारताने टिकटॉकवर याआधीच बंदी घातली आहे.