सुधीर जोशी : मागील आठवडय़ातील अंतरिम अर्थसंकल्पाच्या गडबडीत त्याच दिवशी जाहीर झालेल्या स्टेट बँकेच्या निकालांकडे सर्वाचेच जरा दुर्लक्ष झाले; पण गेल्या वर्षांतील तोटय़ापुढे या तिमाहीतील ३,९५५ कोटींचा नफा नक्कीच स्वागतार्ह आहे. अर्थसंकल्पामधील तरतुदी व कमी झालेले व्याजदर याचा स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा होईल. चालू आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा ठेवत बाजाराने तेजीची वाटचाल सुरू ठेवली. त्याला परदेशी गुंतवणूकदारांचेही पाठबळ लाभले; परंतु शेवटच्या दिवशी विक्रीच्या माऱ्याने आठवडाअखेर मात्र सेन्सेक्समध्ये ७७ आणि निफ्टीमध्ये ४९ अंशांचीच वाढ झाली.

तयार दागिन्यांच्या विक्रीतील भरघोस कामगिरीमुळे टायटनच्या विक्रीत ३४ टक्के, तर नफ्यात ४३ टक्के वाढ झाली. आरती इंडस्ट्रीजच्या विक्रीत २८ टक्के, तर नफ्यात ४७ टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये आपल्या सर्व कारखान्यांसाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डेमिंग हे गुणवत्तेसाठी दिले जाणारे पारितोषिक मिळविणाऱ्या सुंदरम फास्टनर्सच्या विक्रीत २० टक्के, तर नफ्यात २१ टक्के वाढ झाली आहे. मॅरिकोच्या विक्रीत १५ टक्के, तर नफ्यात १२ टक्के वाढ झाली आहे. बाजाराच्या पडत्या काळात कधीही घेऊन ठेवावेत असे हे समभाग आहेत.

आतापर्यंत जाहीर झालेल्या बहुतांश कंपन्यांच्या तिमाही निकालाकडे नजर टाकली तर जाणवते की, एफएमसीजी, बँका व पायाभूत सुविधा या क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल चांगले आहेत. सर्वसाधारणपणे उत्पन्नात २०-२५ टक्के वाढ झाली आहे; परंतु नफ्यामध्ये मात्र पाच-दहा टक्के वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे इंधनाचे व कच्च्या मालाचे गेल्या सहा महिन्यांतील वाढलेल्या किमती आणि रुपयाची घसरण; परंतु डिसेंबरअखेर या दोन्हीत सुधारणा झाली असल्यामुळे पुढील सहा महिन्यांबाबत आशावादी असण्यास हरकत नाही.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र उत्पन्न व नफ्यात भरघोस वाढ झालेली दिसते. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार टेक महिंद्रच्या नफ्यात २७ टक्के वाढ झाली. या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी आपली कर्मचारी संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो व एचसीएल या सर्वानी मिळून नऊ महिन्यांत ७० हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, जी गेल्या पूर्ण वर्षांच्या तुलनेत पाचपटीने जास्त आहे. डिसेंबरच्या तिमाहीतील निकाल, प्रवर्तकांनी व्यक्त केलेला विश्वास व डॉलरमधील मजबुती पाहता गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र आशादायी वाटते.

गुरुवारी जाहीर झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात ०.२५ टक्कय़ांची कपात करून तो आता ६.२५ टक्के करण्यात आला. यामुळे भविष्यात गृह व वाहन कर्जे स्वस्त होऊ शकतात. शेतकऱ्यांना विनातारण मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत वाढ करून ही मर्यादा आता १.६० लाख रुपये केली आहे. गेल्या आठवडय़ातील अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणेच रिझव्‍‌र्ह बँकेनेही ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक असे हे धोरण जाहीर केले आहे.

येत्या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या बऱ्याच स्मॉल कॅप कंपन्यांच्या निकालांकडे आणि महागाई तसेच औद्योगिक उत्पादन दराच्या आकडेवारीवर बाजाराचे लक्ष राहील.