26 January 2020

News Flash

बाजार-साप्ताहिकी : मोठय़ा घडामोडी

वाहन उद्योगाबरोबरच त्यावर अवलंबून असणाऱ्या सुटे भाग निर्मिती उद्योग संकटात सापडले आहेत.

संग्रहित छायाचित्र

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

या आठवडय़ात मोदी सरकारचा काश्मीर बाबतचा निर्णय व अमेरिका-चीनच्या व्यापारयुध्दात दोन्ही देशांनी दाखवलेली आक्रमकता, चीनने डॉलरच्या तुलनेत युआनचे केलेले अवमूल्यन,  रिझव्‍‌र्ह बँकेचे व्याजदर बदलाचे पतधोरण, परदेशी गुंतवणूकदांरावरील कर भारावर मिळू शकणाऱ्या सवलतीची बातमी अशा मोठय़ा घटनांनी भांडवली बाजार ढवळून निघत होता व रोज निर्देशांकांत मोठे चढ-उतार दाखवित होता. अर्थसंकल्पानंतर सलग चार आठवडे घसरणाऱ्याया बाजाराने अखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्स) ४६३ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) ११२ अंकांची साप्ताहिक वाढ दाखवली.

रिझव्‍‌र्ह बँकेने थोडा हात सैल सोडत यंदा ०.३५ टक्यांची रेपो दर कपात केली व बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना अधिक कर्ज देण्याची मुभा बँकाना दिली. परंतु सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या वेगामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली. त्याची नकारात्मक प्रतिक्रिया बाजारात बुधवारी उमटली.

टाटा स्टील व महिंद्र आणि महिंद्रच्या तिमाहीचे निकालांनी निराशा केली व भविष्यासाठी विशेष आशा व्यक्त केल्या नाहीत. अल्ट्राटेक सिमेंट व गोदरेज प्रॉपर्टीजच्या तिमाही नफ्यात वाढ दिसली. दोन्ही कंपन्या घरबांधणी व्यवसायाला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचे लाभार्थी ठरतील.

गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांची रोकड सुलभता वाढण्यासाठी नॅशनल हाऊसिंग बँकेने १० हजार कोटी रुपयांचे कर्ज अशा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.

स्वस्त घरांसाठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांची कामगिरी चांगली असूनदेखील गृह फायनान्स, कॅनफिन होम, पीएनबी हाऊसिंग, एलआयसी हाऊसिंग फायनान्स या सारख्या कंपन्यांचे भाव पडझडीत खाली आले आहेत. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक संधी दिसत आहे.

डाबर व मॅरिको यांची नावे गेल्या महिन्यांभरातील बाजाराच्या पडझडीतून वाचलेल्या समभागांमध्ये घेता येतील.

तीन वर्षांंपूर्वी खऱ्या अर्थाने उभ्या ठाकलेल्या पतांजलीचे आव्हान त्यांनी लिलया पेलले. दोन्ही कंपन्यांची गेल्या आर्थिक वर्षांंतील व गेल्या तिमाहीतील कामगिरी चांगली आहे व पुढील वाटचालीबद्दल प्रवर्तकांना विश्वास आहे.

बऱ्याच वेळा बाजारात येणारी नवीन कंपनी तात्कालिक स्पर्धा निर्माण करते; पण एकूण बाजारपेठ विस्तारते. आयुर्वेद व नैसर्गिक औषधांचा बोलबाला पतांजलीमुळे झाला.

पण या जुन्या जाणत्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनात बदल घडवून किंवा जाहिरातीत आपल्या उत्पादनांच्या नैसर्गिक तत्वांवर भर देवून या आव्हानाचे संधीत रूपांतर केले. बाजारातील मंदीचे सावट दूर होईल तेव्हा या कंपन्यांची कामगिरी उठून दिसेल.

वाहन उद्योगाबरोबरच त्यावर अवलंबून असणाऱ्या सुटे भाग निर्मिती उद्योग संकटात सापडले आहेत. सध्या बाजारात आलेल्या तेजीत वाहन व वाहनांच्या सुटय़ा भागांच्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करता येईल.

मोसमी पावसाची समाधानकारक प्रगती, कमी झालेले व्याजदर, कच्या इंधनाचे वाजवी दर, काश्मिरच्या निर्णयाचे माफक दुष्परिणाम, सरकारचे अर्थव्यवस्थेवरील लक्ष अशा सकारात्मक गोष्टी बाजाराला उभारी देतील का याकडे सर्वांचे लक्ष राहील.

वित्त मंत्रालयाच्या उद्य्ोजकांबरोबर व परदेशी गुंतवणूकदारांबरोबर झालेल्या बैठकी नंतर सरकारने कर पध्दतिबाबत अपेक्षित निर्णय घेतले तर ते बाजारात उत्साह आणतील.

First Published on August 10, 2019 3:32 am

Web Title: weekly financial market update mumbai stock market update zws 70
Next Stories
1 व्यावसायिकांसाठी थोडक्यात; पण महत्वाचे..
2 आयएल अँड एफएस प्रकरणी लेखा परिक्षण कंपन्यांना बंदी लागू होणार
3 एक लाख कोटींचे ‘उत्तेजन’ हवे!
Just Now!
X