सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

जागतिक व्यापार युद्धाचे सावट आणखीनच गहिरे होत असताना एप्रिलमधील किरकोळ महागाईच्या निर्देशांकाच्या सहामाही उच्चांकाने त्यात भर घातली. त्यामुळे बाजाराची सुरुवात या आठवडय़ात मोठय़ा घसरणीने झाली. त्यानंतर दिवसाआड चढ-उताराची आंदोलने घेत शेवटच्या दोन दिवसांत बाजाराने, निवडणुकांच्या सकारात्मक निकालांची चाहूल लागल्यासारखी, जोमदार आगेकूच केली. आठवडाअखेर मुंबई बाजाराचा निर्देशांकाने ४६८ अंशांची साप्ताहिक वाढ, तर निफ्टी १२९ अंशांची वाढ दाखवून बंद झाला.

टाटा केमिकल्सचा आपला ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसाय टाटा ग्लोबल बेव्हरेजेसकडे हस्तांतर करण्याचा निर्णय दोन्ही कंपन्यांच्या हिताचा आहे. त्याचे परिणाम गुरुवारी दोन्ही कंपन्यांच्या अनुक्रमे ८ व ११ टक्क्यांनी वाढलेल्या बाजारभावात दिसले. सोडा अ‍ॅश बनविणाऱ्या कंपनीने आपले उपउत्पादन ‘देश का नमक’ म्हणून विकणे ठीक होते. पण नंतर लोणची व डाळी विकण्याचा व्यवसाय हा अव्यापारेषु व्यापार होता. तशीच काहीशी गत आयटीसीची झाली आहे. कंपनीने सिगारेटच्या व्यवसायातील भावी धोके ओळखून हॉटेल, पेपर, माहिती तंत्रज्ञान, तयार कपडे, तयार खाद्यपदार्थ, लेखनसामग्री, सागरी उत्पादन निर्यात, अगरबत्ती (जिचे सिगारेटशी धुराइतकेच साम्य आहे) अशा अनेक गोष्टीमधे हात घातला आहे. बाजार अशा कंपन्यांना त्या क्षेत्रातील इतर कंपन्यांइतके मूल्य देत नाही. परंतु हे व्यवसाय वेगळे केले की त्यांचे कितीतरी जास्त मूल्य मिळते.

भारतातील सर्वात मोठय़ा गृह-कर्ज कंपनी – एचडीएफसीच्या वार्षिक निकालांनुसार प्रति समभाग उत्पन्नात भांडवली नफा सोडला तर ५८ टक्के वाढ झाली आहे. गैरबँकिंग वित्त संस्थांमधील या कंपनीला नवीन भांडवल / कर्ज उभारायला कधीच अडचण येत नाही. त्याचप्रमाणे बजाज फायनान्सने देखील कठीण काळात प्रति समभाग मिळकतीत वार्षिक ४६ टक्के वाढ जाहीर केली आहे. आपल्या पोर्टफोलियोसाठी या सदाबहार कंपन्या आहेत.

घाऊक महागाईच्या निर्देशांकात व निर्मिती क्षेत्रात घट झाली असून किरकोळ महागाईचा दर वाढला असला तरी रिझव्‍‌र्ह बँकेच्या ३ टक्के मर्यादेत राहिल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नेहमीच्या पाव टक्के कपातीपेक्षा जास्त दरकपातीची मागणी स्टेट बँकेकडून करण्यात आली आहे. येणाऱ्या सरकारला अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींमधील हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.

रविवारी निवडणुकांच्या मतदानोत्तर कल चाचणीचे अंदाज जाहीर होतील. आठवडय़ाची सुरुवात त्यावरील प्रतिक्रियेने होईल तर आठवडय़ाचा शेवट निवडणुकांच्या अंतिम निकालांवरील प्रतिक्रियेने होईल. त्यामुळे त्या दरम्यान बाजार अतिशय दोलायमान राहील. निकालांनंतर गुंतवणूकदारांनी काय करायचे हा एक मोठा चच्रेचा विषय आहे. भारतीय बाजाराचा अस्थिरता निर्देशांक (व्हीआयएक्स) सध्या २८ अंशाच्या वर आहे. जो सामान्यापणे १२ – १५ च्या दरम्यान असतो. त्यामुळे अल्प मुदतीत फायदा मिळण्याचे सौदे सामान्य गुंतवणूकदारांनी अजिबात करू नयेत. बाजारातील अस्थिरता संपल्यावर खासगी बँका, माहिती तंत्रज्ञान व ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधे एक-दोन वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक करण्यास हरकत नाही.