20 January 2021

News Flash

बाजार-साप्ताहिकी : विक्रमी टप्पा!

अर्थव्यवस्थेत वेगाने होणारी वाढ माल वाहतूक कंपन्यांसाठी पोषक आहे.

’ सुधीर जोशी

गेल्या सप्ताहातील जागतिक बाजारातील सुखद बातम्यांना या सप्ताहाच्या सुरुवातीलाच भारतातील आर्थिक सकारात्मक आकडेवारीची जोड मिळाली. अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने सुधारलेला विकास दर, वस्तू व सेवा कर संकलनाने सलग दुसऱ्या महिन्यात पार केलेले एक लाख कोटींहून अधिकचे आकडे, मासिक वाहन विक्रीतील तेजीचे सातत्य अशा काही वस्तुस्थिती दर्शक आकडेवारीने स्थानिक भांडवली बाजाराला बळ दिले. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टी सलग पाचव्या सप्ताहात वरच्या स्तरावर बंद झाले.

अर्थव्यवस्थेत वेगाने होणारी वाढ माल वाहतूक कंपन्यांसाठी पोषक आहे. ब्लु डार्ट ही जगातील एक नावाजलेली कंपनी भारतातील करोना लशीच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा (उणे ८० तापमानामध्ये साठवणूक व वाहतूक) पुरविण्यासाठी सज्ज होत आहे. कंपनीमध्ये आधुनिक तंत्रस्नेही कार्यपद्धती आधीपासूनच प्रचलित आहेत. डीएचएल या जगातील पहिल्या क्रमांकाच्या कंपनीबरोबर या कंपनीचा सहकार्य करार आहे. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील निकाल आकर्षक आहेत.

नफ्यामध्ये वार्षिक तुलनेत तीनपट वाढ झाली आहे. कंपनी जानेवारी २०२० पासून सेवा किमतींमध्ये वाढ करणार आहे. करोनानंतरच्या कालावधीतील संधींचा फायदा घेण्यासाठी या कंपनीमधील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे. औद्योगिक प्रगतीचे संकेत मिळताच सरकारी बँकांचे समभागही बाजारातील तेजीमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. परंतु याचा फायदा घेण्यासाठी या बँकांपैकी स्टेट बँक व बँक ऑफ बडोदा याखेरीज इतर बँकांमधील गुंतवणूक धाडसाची ठरेल. मागे लिहिल्याप्रमाणे, टाळेबंदी काळातून बाहेर येताना पोलाद कंपन्यांसारखे मूलभूत उद्योगांना बळ मिळू लागले आहे. त्याचा परिणाम या सप्ताहात सेल, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात दिसला. अजूनही त्यामधील गुंतवणुकीची संधी संपलेली नाही. अशाच मूलभूत उद्योगांपैकी टाटा पॉवरच्या समभागात या सप्ताहात तेजी दिसून आली. ही कंपनी कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलत आहे. ग्रामीण भागातील सौर ऊर्जा प्रकल्प, सौर दिवे तसेच विजेवर चालणाऱ्या प्रवासी वाहनांसाठी ‘चार्जिग स्टेशन’ आदी नवीन व्यवसायात कंपनी वाटचाल करत आहे. या कंपनीत दीर्घ मुदतीसाठीची गुंतवणूक फायदा देईल.

रिझव्‍‌र्ह बँकेने एचडीएफसी बँकेतील सततच्या तांत्रिक बिघाडामुळे बँकेच्या नवीन क्रेडिट कार्ड वितरणावर व प्रस्तावित डिजिटल उपक्रमांनी नवीन ग्राहक जोडण्यावर तात्पुरती बंधने आणली व बँकेचे समभाग काही प्रमाणात गडगडले. कुठल्याही क्षेत्रातील अग्रणी कंपनीवर असे संकट येते तेव्हा ती खरेदीची संधी असते. या सप्ताहामध्ये प्रमुख निर्देशांकांबरोबर मिड कॅप वर्गातल्या अनेक समभागांमध्ये खरेदी दिसून आली. मिड कॅप निर्देशांक पाच टक्क्य़ांनी वर गेला. रिझव्‍‌र्ह बँकेने सर्व व्याजदर कायम ठेवत विकास दरातील घसरणीचा अंदाज कमी केला व उद्योगप्रिय धोरणे राबवण्याचा पुनरुच्चार केला. सहकारी बँकांमधील लाभांश मर्यादा कायम ठेवत बँकांना सशक्त करण्याचे धोरण कायम ठेवले. बाजाराने त्याचे स्वागत करत निर्देशांकांची दौड सुरूच ठेवली व दोन्ही प्रमुख निर्देशांक सप्ताहाखेरीस विक्रमी पातळीवर बंद झाले. गुंतवणूकदारांनी थोडा नफा वसूल करून गुंतवणुकीच्या नव्या क्षेत्रांकडे लक्ष ठेवावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:51 am

Web Title: weekly financial market update weekly stock market review zws 70
Next Stories
1 सेन्सेक्स ४५ हजारावर; निफ्टीचा नव्याने विक्रम
2 RBI Monetary Policy 2020 : रिझव्‍‌र्ह बँकेचे व्याजदर स्थिरच
3 विमान क्षेत्राला करोनाचा फटका, आर्थिक वर्षात २१ हजार कोटींच्या तोट्याचा अंदाज
Just Now!
X