सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

स रलेल्या आठवडय़ात बाजाराला दोन दिवस सुटी असल्यामुळे प्रत्यक्ष कामकाज तीनच दिवस झाले. त्यामध्ये दोन दिवस तेजीचे तर एक विश्रांतीचा! पर्जन्यमानाचे समाधानकारक अंदाज, विदेशी गुंतवणूकदारांचा वाढता पाठिंबा, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी केलेली वार्षिक निकालांची दमदार सुरूवात, निर्यातीमधील वाढ अशा सकारात्मक बाबींमुळे या आठवडय़ाच्या सुरूवातीला निर्देशांक सुसाट सुटले व त्यांनी नवीन उच्चांक गाठले आणि तिसऱ्या दिवशी मात्र उसंत घेऊन कामकाजाच्या अखेरच्या दिवशी आठवडयात मुंबई बाजाराच्या निर्देशांकात ३७३ व निफ्टीमध्ये १०९ अंकांची वाढ दर्शविली गेली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी वार्षिक निकालांची दमदार सुरुवात केली. विविध निकषांवर टीसीएसची कामगिरी थोडी उजवी असल्यामुळे आणि इन्फोसिसच्या आगामी वर्षांतील नफ्याच्या सावध अंदाजामुळे त्यांच्या बाजारमुल्यात अपेक्षित वाढ-घट झाली. टीसीएस, इन्फोसिसच्या तुलनेत विप्रोची कामगिरी थोडी डावी वाटते. विप्रो व इन्फोसिसच्या पुनर्खरेदीच्या प्रस्तावांमुळे त्यांचे बाजारमुल्य फारसे घटणार नाही.

आयसीआयसीआय लोंबार्ड या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपनीने वार्षिक निकाल जाहीर करताना प्रति समभाग नफ्यात २१ टक्के वाढ जाहीर केली. सप्टेंबर २०१७ मध्ये ६६१ रुपयाने सार्वजनिक विक्री केलेल्या समभागाचा सद्यभाव  १,०९२ आहे. भारतातील सर्वसाधारण विम्याची बाजारपेठ साधारणपणे वार्षिक १७ टक्क्य़ाने वाढत आहे व अजून वाढ होण्यास भरपूर वाव आहे. वाहन विक्रीतील वाढ, लोकांचे वाढणारे उत्पन्न, आरोग्य विम्याबद्दल जागृती, पीक विम्याच्या योजना, औषध उपचारांचा वाढता खर्च या सर्वांचा सर्वसाधारण विमा व्यवसायातील कंपन्यांना फायदा होत राहील. त्यामुळे या समभागाकडे लक्ष ठेवून योग्यवेळी पोर्टफोलियामध्ये त्याचा योग्य प्रमाणात समावेश करावा.

देशातील सर्वात मोठय़ा सूचिबद्ध रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्चअखेर संपलेल्या वर्षांत प्रति समभाग नफ्यात ९.६ टक्के वाढ जाहीर केली आहे. पारंपरिक तेल व्यवसायात नफ्याचे प्रमाण कमी झाले असले तरी दूरसंचार व किराणा व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय ग्राहकांचा ऑनलाईन खरेदी वरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला कपडे, सौंदर्य प्रसाधने, पुस्तके, मोबाइल व इतर नित्योपयोगी माफक किंमतीची खरेदीकरणारा ग्राहक विशेषत: तरुणवर्ग आता दूरचित्रवाणीसंच, वातानुकूलयंत्रे, शीतकपाटसारख्या महागडय़ा वस्तूदेखील ऑनलाईन मागावू लागला आहे. या परिवर्तनाचा फायदा घेण्यास रिलायन्स सज्ज होत आहे. किरकोळ विक्रीदालने व दूरसंचार क्षेत्रात आघाडी घेतल्यानंतर आता इ-कॉमर्स मध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचा हा धोरणात्मक  निर्णय कंपनीला नेहमीप्रमाणेच आघाडीवर ठेवील.

कंपन्यांच्या वार्षिक निकालांच्या मोसमामुळे बाजार नवीन उच्चांकाकडे लक्ष ठेवेल; मात्र निवडणुकांमुळे असलेली अस्थिरता व नफारुपी विक्रीचा दबाव यामुळे बाजार ठराविक मर्यादेत मार्गक्रमण करेल. अवाजवी मुल्यांकन असलेल्या कंपन्यांना गुंतवणुकीतून वगळण्यासाठी हिच संधी आहे.