सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

मामागील आठवडय़ातील लेखात म्हटल्याप्रमाणे बाजार कुठल्याही प्रतिकूल गोष्टींवर प्रतिक्रिया न देता नवनवीन शिखरे गाठत आहे. बुधवारी सेन्सेक्सने ४०८१६ अंशांचा उच्चांक गाठला. निफ्टीनेदेखील १२१०३ च्या उच्चांकी मजल मारली. रिलायन्स इंडस्ट्रीजने १५७२ रुपयांचा उच्चांक गाठला आणि कंपनीचे बाजार मूल्य दहा लाख कोटींच्या टप्प्यात आले. रोज मामुली चढ-उतार करीत सप्ताहअखेर सेन्सेक्स ३ अंश, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात १९ अंशांची किरकोळ साप्ताहिक वाढ झाली.

औषध कंपन्यांच्या बऱ्याच सकारात्मक बातम्या आल्यामुळे औषध उद्योग निर्देशांकात वाढ झाली. डिव्हीज लॅबच्या अमेरिकन औषध संचालनालयाकडून (यूएस एफडीए) झालेल्या परीक्षणात काहीही आक्षेप नोंदविले नसल्यामुळे कंपनीचे समभाग तेजीत राहीले. औषध क्षेत्रातील ही कंपनी गेले काही वर्षे स्थिर कामगिरी करीत आहे. या समभागात केलेली गुंतवणूक दीर्घावधीत फायद्याची ठरेल.

सद्भव इंजिनीअरिंग लिमिटेड ही स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील मिड कॅप कंपनी आहे. कंपनीचे आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. कंपनीच्या महसुलात मागील वर्षांच्या तुलनेत १८ टक्के घट झाली. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राचे लेखे वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. एखाद्या प्रकल्पाच्या कंत्राटी मूल्याच्या तुलनेत जितका प्रकल्प पूर्ण झाला त्याच्या विशिष्ट टक्के रक्कम विक्री म्हणून नोंदली जाते. निर्धारित वेळेपेक्षा प्रकल्प पूर्ण करण्यास झालेला उशीर आणि लांबलेल्या पावसामुळे या तिमाहीची विक्री कमी नोंदली गेली. याव्यतिरिक्त घसाऱ्यात झालेल्या वाढीने नफ्यावर परिणाम झाला. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीअखेर कंपनीकडे ९५०० कोटी रुपयांच्या मागण्या नोंदल्या आहेत. कर्जाची परतफेड झाल्याने सुरू असलेल्या प्रकल्प मूल्याच्या तुलनेत कर्जात घट झालेली दिसते. पुढच्या दोन तिमाहींमध्ये उशीर झालेल्या प्रकल्पांनी पूर्वनिर्धारित प्रगती केलेली असेल. ‘बीओटी’ तत्त्वांवर विकसित केलेल्या मालमत्ता विकून आलेल्या पैशातून कर्ज फेडण्याचे प्रयोजन असल्याचा कंपनीचा विचार आहे. एका वर्षांसाठी खरेदीसाठी या समभागाला विचारात घेता येईल.

कॅथॉलिक सीरियन बँकेची प्रारंभिक समभाग विक्री सध्या खुली आहे. खासगी बँकांच्या अनुत्पादित कर्जाचे आकडे प्रारंभिक विक्रीनंतर बाहेर येतात असा अनुभव आहे. तेव्हा सूचिबद्धतेनंतर त्वरित फायदा मिळविण्यासाठी समभागांसाठी अर्ज करायला हरकत नाही.

औद्योगिक उत्पादनातील घट, महागाईने डोके वर काढण्यास केलेली सुरुवात, रोजगारातील घट, मंदीचा सर्वच क्षेत्रांवर दबाव परंतु शेअर बाजारांचे निर्देशांक ऐतिहासिक वरच्या पातळीवर अशी विचित्र अवस्था सध्या अनुभवास मिळत आहे. काही मोजक्या कंपन्यांचे समभाग निर्देशांकांना वर नेत आहेत. अशा वेळी या समभागांची अवास्तव भावात खरेदी करावी काय, अशा संभ्रमात सामान्य गुंतवणूकदार आहेत. सध्याच्या बाजाराचे उच्च मूल्यांकन पाहता, थोडी सावधगिरी बाळगून अल्प मुदतीच्या घसरणीची वाट पाहणेच इष्ट ठरेल.