17 October 2019

News Flash

बाजार-साप्ताहिकी : अविरत घसरण..

रोखे बाजारातील घडामोडींचे सावटही सध्या शेअर बाजारावर आहे.

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

अमेरिकन वस्तूंवरील आयात करात भारताने वाढ केल्यामुळे जागतिक व्यापार युद्ध सर्वव्यापी होण्याच्या भीतीने या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदविली. मात्र दुसऱ्याच दिवशी अमेरिकन अध्यक्षांनी चीनबरोबर बोलणी करण्याचे संकेत दिले व बाजार सावरला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने नजीकच्या भविष्यात व्याजदर कमी करण्याचे संकेत दिल्यामुळे गुरुवारी पुन्हा मोठी निर्देशांकातील तेजी पाहायला मिळाली; मात्र दुसऱ्याच दिवशी बाजार पुन्हा घसरला. आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) २५८ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) ९९ अंशांची साप्ताहिक घट नोंदवून या महिन्याच्या सलग तिसऱ्या आठवडय़ात घसरण कायम राखली.

रोखे बाजारातील घडामोडींचे सावटही सध्या शेअर बाजारावर आहे. येस बँक, दिवाण हाऊसिंग फायनान्स, झी समूह, आयएल अँड एफएस, जैन इरिगेशन, जेट एअरवेज आदींसंदर्भातील घटना जवळपास एकाच वेळी घडणे हा काही योगायोग नाही. बाजारातील रोकड तरलतेचा अभाव, नवीन सरकारच्या पहिल्याच महिन्यातील कणखर धोरणांमुळे बँका, पतमापन कंपन्या, लेखा परीक्षण कंपन्या या सर्वानीच कडक धोरण अवलंबिले आहे. त्याचा परिणाम दिसत आहे.

एचडीएफसी लिमिटेडचा अपोलो म्युनिक या आरोग्य विमा कंपनीतील हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय कंपनीचा विमा क्षेत्रातील सहभाग वाढविण्यास उपयुक्त आहे. त्याचे फायदे दिसण्यास थोडा काळ जाऊ द्यावा लागेल. विक्रीमधून मिळालेल्या रकमेतून अपोलो हॉस्पिटलच्या प्रवर्तकांना गहाण ठेवलेले समभाग सोडवता येतील व अपोलो हॉस्पिटलचे कर्ज थोडे कमी होईल.

महिंद्र आणि महिंद्रने नवीन सुरक्षा प्रणालीअंतर्भूत करण्यासाठी वाहनांच्या किमती १ जुलैपासून ३६ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन विक्रीतील मंदीच्या काळातील हा निर्णय एसयूव्ही वाहन प्रकारातील कंपनीचे असलेले वर्चस्व दर्शवितो. सध्या सर्वच वाहन उद्योगांनी मागणीअभावी उत्पादन कमी केले आहे, तसेच जून महिन्याचे चारचाकी वाहन विक्रीचे आकडेही गेल्या महिन्याप्रमाणेच फारसे आशादायी असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या कंपनीचे व आघाडीवर असणाऱ्या मारुती सुझुकीचे समभाग पुढील दोन – तीन महिन्यांत आकर्षक मूल्याला मिळू शकतील.

बिगरबँकिंग वित्त कंपन्या रोकड सुलभतेच्या संकटात असताना त्याचा कमीत कमी परिणाम झालेली, सर्वदूर पसरलेली वितरण व्यवस्था असलेली व स्वस्त घरांसाठी कर्जवाटप करणारी कंपनी म्हणजे एलआयसी हाऊसिंग फायनान्स. यामधील गुंतवणूक पुढील वर्षभरात फायदा मिळवून देईल.

यंदा मोसमी पावसाला उशीर झाला तरी पाऊ स पुरेसा होणे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. अन्नधान्याच्या किमती व पर्यायाने महागाईवरील नियंत्रण, शेतकऱ्यांना द्यावे लागणाऱ्या अनुदानातील घट, ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यामुळे मिळणारी चालना या सर्वाची सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप आवश्यकता आहे. देशातील ठळक संकेतांमध्ये पावसाचे अनुमान व येत्या १५ दिवसांत सादर होणारा अर्थसंकल्प आणि जागतिक पातळीवरील व्यापारयुद्ध तसेच इंधन तेलाचे भाव आदी बाबींचा भांडवली बाजार सध्या अंदाज घेत आहे, असे दिसते.

 

First Published on June 22, 2019 3:11 am

Web Title: weekly stock market analysis indian stock market markets expert view zws 70