सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पूर्ण बहुमतातील सरकार येण्याच्या निकालपूर्व अंदाजांवर सोमवारी बाजाराने गेल्या दशकभरातील विक्रम मोडणारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,४२२ अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ४२४ अंशांनी वधारला. २३ मेच्या प्रतीक्षेत उरलेले दोन दिवस उच्चतम अस्थिरतेत बाजाराची वाटचाल चालू राहिली. निकालाच्या दिवशी सकाळी निकालांचे कल जाहीर झाल्यावर वाढलेला उत्साह बाजार बंद होताना मात्र मावळला.

बाजार वास्तविकतेपेक्षा अपेक्षांवर तीव्र प्रतिक्रिया देतो हे पुन्हा अधोरेखित झाले. आठवडाअखेर पुन्हा तेजीने निर्देशांक बहरले. परिणामी सेन्सेक्सने १,५०४ अंश तर निफ्टीने ४३७ अंशांची साप्ताहिक वाढ दाखवली.

या वर्षांतील सर्वोच्च उत्कंठेच्या आठवडय़ात बाजाराचे लक्ष फक्त सरकार कुणाचे येणार याकडेच होते. मग अमेरिका – चीन व्यापार संबंधातील तणाव, इंधनाचे वाढणारे भाव, जागतिक बाजारातील मंदीचे सावट, भारतातील बऱ्याचशा कंपन्यांची वर्षअखेरची निराशाजनक कामगिरी, अर्थव्यवस्थेतील मरगळ याकडे सर्वाचे दुर्लक्षच झाले होते. निवडणुका व नवीन सरकारचा हर्षोल्हास संपताच या गोष्टींची बाजार दखल घेईल.

बँक ऑफ बडोदाचा तोटा बराच कमी झाला आहे, अनुत्पादित कर्जाचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत अनुत्पादित कर्जासाठी जास्त तरतूद केली आहे. सरकारी बँकांतील दुसऱ्या स्थानावरील ही बँक पुढील वर्षांपर्यंत इतर दोन (देना आणि विजया) बँकांच्या विलीनीकरणामुळे एक मजबूत बँक बनेल.

वाहन व्यवसाय कठीण परिस्थितीमधून जात असतानाही भारत फोर्जने वर्षअखेर चांगली कामगिरी बजावली आहे. सहा महिन्यांनी अपेक्षित असलेली वाहन उद्योगातील सुधारणा कंपनीला पोषक ठरेल. मार्चअखेरच्या वर्षांत नफा, विक्री व नफ्याचे प्रमाण या सर्व बाबतीत अग्रेसर ठरलेल्या आरती इंडस्ट्रीजचा गुंतवणुकीसाठी विचार करण्यास हरकत नाही.

टाटा मोटर्सच्या भारतातील कामगिरीत थोडी सुधारली आहे. परदेशी बाजारपेठांत विशेषत: चीनमधील वाहन उद्योगास गती मिळून तो वर येण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे पुढील दोन तिमाहींच्या आकडेवारीकडे लक्ष ठेवून सध्या नीचतम पातळीत असणाऱ्या या समभागावर नजर ठेवायला हवी.

भारतीय बाजाराचे मूल्य सध्या उच्चतम पातळीला आहे. २०१४ च्या निवडणुकांआधी निफ्टीच्या उत्सर्जनाचे बाजारभावाशी गुणोत्तर (पी/ई रेशो) १८ होते जे सध्या २९ आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कंपन्यांचे समभाग सुसाट वाढण्याची शक्यता नाहीच. परंतु ते वाजवी पातळीवर येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लार्ज कॅप शेअरमधील गुंतवणूक कमी करणे फायद्याचे ठरेल. गुंतवणूक करायचीच असेल तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या योग्य वाटतात. येणाऱ्या काही दिवसांत नवीन सरकारची धोरणे, महत्त्वाच्या खात्यांचे वाटप याकडे बाजार लक्ष ठेवेल.