सुधीर जोशी

बाजारातील तेजीचे वातावरण या सप्ताहातही टिकून राहिले. खासगी तसेच सार्वजनिक बँकांमधील तेजी व परदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग याला मुख्यत्त्वे कारणीभूत होते. दुचाकी वाहनांच्या वस्तू व सेवा करात कपात करण्याच्या अर्थमंत्र्यांच्या इराद्यामुळे हीरो मोटर्स, बजाज ऑटोसारख्या कंपन्यांमध्ये तेजी बघायला मिळाली. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अनुक्रमे १,०३३ व २७७ अंशांची वाढ झाली. या वाढीत मुख्यत्वे बँकांच्या समभागवाढीचा मोठा वाटा होता. कर्ज हप्ते फे डण्याच्या स्थगितीत वाढ न दिल्याने आणि अर्थव्यवस्थेतील विपुल रोकड सुलभता या वाढीस कारण ठरले.

इंद्रप्रस्थ गॅसच्या पहिल्या तिमाहीतील नफा ८५ टक्क्यांनी खाली आला. सध्या सार्वजनिक वाहन व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू नाही आणि कंपनीला ७५ टक्के उत्पन्न सीएनजीच्या विक्रीतून मिळते. त्यामुळे कंपनीच्या बाजारभावातील घसरणीकडे दोन वर्षांच्या गुंतवणुकीची संधी म्हणून पाहता येईल. कॅम्लिन फाइन सायन्सेस ही पारंपरिक अ‍ॅंटिऑक्सिडंट्स, सुगंध द्रव्ये तयार करणारी कंपनी आहे. तयार अन्न व पेटफूडचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी त्यांचा प्रामुख्याने वापर होतो. अधिक नफाक्षम उत्पादनांवर भर दिल्याने आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे कॅम्लिन फाइन सायन्सेसच्या पहिल्या तिमाहीतील नफा अपेक्षेपेक्षा जास्त आहे.

दहेज येथील उत्पादनांची सुरुवात व उत्पादनातील धोरणात्मक बदल यामुळे कंपनीचे उर्वरित वर्ष प्रगतीचे असेल. मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी कंपनीचा विचार करावा. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स ही कंपनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील कंत्राटदार आहे. करोनामुळे टाळेबंदी घोषित केल्याने कामगारांची कमी उपलब्धता असूनही जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सने काम सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी मुख्यत्वे रस्त्यांच्या कामाला गती दिली असून ही कामे महसुलात भर टाकणारी असतात. टाळेबंदीमुळे स्थगित झालेल्या  कामांना आता सुरुवात झाल्याने दुसऱ्या तिमाहीच्या उत्पन्नात आणि उत्सर्जनात पहिल्या तिमाहीच्या तुलनेत वाढ होणे अपेक्षित आहे. कंपनीकडे रस्ते व पूल, इमारती, मेट्रो, रेल्वे, भुयारी मार्ग आणि स्काय-वॉक यासारख्या शहरी पायाभूत सुविधा राबवण्याचा मोठा अनुभव आहे. कंपनीकडे पुरेसे प्रकल्प असून या प्रकल्पांच्या कामांच्या अंमलबजावणीने वेग घेतल्याने या तिमाहीचे उत्पन्न आणि नफा करोनापूर्व पातळीवर आलेले दिसेल.

नजीकच्या भांडवली लाभासाठी वाचकांना या कंपनीची शिफारस करत आहे.

अर्थव्यवस्थेबाबत आकडेवारी वस्तुस्थिती आहे तर बाजाराची वाढणारी पातळी स्वप्नवत आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती आणि बाजाराचे वर्तन यांच्यातील तफावत रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनीदेखील अधोरेखित केली. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सावधगिरी व धाडस याचा मेळ घालत गुंतवणुकीचे व्यवहार करणे आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयात टाळेबंदीकालीन व्याज आकारणीस स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर होणारा निर्णय तसेच पुढील सप्ताहात ऑगस्ट महिन्यातील वाहन विक्री, वस्तू व सेवा करांचे आकडे यावर बाजाराची पुढील वाटचाल अपेक्षित आहे.

sudhirjoshi23@gmail.com