सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या तीन दिवसांत साधलेल्या तेजीने या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी थोडी उसंत घेऊन आपली घोडदौड पुढे सुरू ठेवली. अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर करीत असलेले उपाय, वस्तू व सेवा करांमधील टळलेली दरवाढ, अमेरिका व चीनमधील व्यापार तणाव निवळणे व परदेशी गुंतवणुकीवरील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता यामुळे विदेशी गुंतवणूकदारांच्या आशा बळावल्या. त्यांच्याकडून होणाऱ्या वाढत्या खरेदीमुळे रोज निर्देशांकांनी नवा उच्चांक गाठला. सप्ताहअखेर सेन्सेक्समध्ये ६७२ अंशांची, तर निफ्टीत १८५ अंशांची साप्ताहिक वाढ झाली.

सध्या विदेशी गुंतवणूकदारांच्या विमा कंपन्यांमधील सहभागावर ४९ टक्के मर्यादा आहे. यामध्ये वाढ करण्याचा विचार मागील वर्षांच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला होता. यावर भारतीय विमा प्रधिकरणाचे मत सरकारने मागविले होते. भारतीय विमा प्रधिकरणाने ही मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार सरकारने कायदेशीर बदल केले तर हे सर्व विमा कंपन्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. या क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, आयसीआयसीआय लोम्बार्ड या समभागांनी गेल्या वर्षांत ५० टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे. परंतु भारतातील विमा व्यवसायाच्या विस्ताराला अजून बराच वाव आहे. त्यामुळे संधी मिळताच या उदयोन्मुख क्षेत्रातील कंपन्यांमध्ये शिरकाव करणे दीर्घकालीन फायद्याचे ठरेल.

हिंदुस्तान युनिलिव्हरच्या व्यवस्थापनाने विक्रीमध्ये मंदीचे संकेत दिले व कंपनीच्या समभागात साडेतीन टक्के घट पाहायला मिळाली. ग्राहक उपभोग्य वस्तूंच्या या आघाडीच्या कंपनीने अशी अनेक वादळे अनुभवली आहेत. ग्लॅक्सो स्मिथक्लाइनने आपला काही व्यवसाय कंपनीला विकल्यावर मिळालेले समभाग जर बाजारात विकले तर हिंदुस्तान युनिलिव्हरच्या समभागांवरील विक्री दबाव आणखी वाढेल, पण चाणाक्ष गुंतवणूकदारांसाठी ही संधी असेल.

राष्ट्रीय कंपनी-विधी अपील न्यायाधिकरणाने टाटा सन्सच्या विरोधात दिलेला निकालावर बाजाराने विविध टाटा कंपन्यांच्या समभागांवर प्रतिकूल प्रतिक्रिया दिली. टाटा समूहातील कमकुवत कंपन्यांवर (टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, टाटा कॉफी, टाटा मोटर्स) त्याचा जास्त परिणाम झाला तर बलाढय़ कंपन्यांवर (टीसीएस, टाटा स्टील) फारसा परिणाम झाला नाही. किंबहुना, दुसऱ्याच दिवशी त्यांचे समभाग उसळी घेऊन वर आले. गुंतवणूकदारांना टाटा समूहातील कंपन्यांच्या गुंतवणुकीतील सुरक्षा व व्यवहार्यतेबाबत तौलनिक अभ्यासाची ही एक संधी मिळाली.

बाजार तेजीत असताना प्रिन्स पाइप्सच्या प्रारंभिक विक्रीला प्रतिसाद थंड राहिला. बाजार सध्याच्या परिस्थितीत फक्त चांगली कामगिरी करणाऱ्या निवडक समभागांना प्राधान्य देत असल्याचेच यातून अधोरेखित होते. या क्षेत्रातील अ‍ॅस्ट्रल पाइप्स व सुप्रीम इंडस्ट्रीजचे समभाग कितीतरी अधिक नफा-किंमत गुणोत्तराला मिळत असले तरी गुंतवणूक करण्यासारखे आहेत.

पुढील आठवडय़ात कारभार चार दिवसच चालेल व नाताळच्या सुटीचे दिवस असल्यामुळे बाजारात फारशी उलाढाल होणार नाही. पण एकंदरीत बाजाराचा मूड तेजीचाच आहे.