सुधीर जोशी

बाजाराच्या कणखर वाटचालीचा अनुभव परत सप्ताहात आला. चीनच्या सीमेवरील चकमकीच्या बातमीने मंगळवारी निर्देशांकात खळबळ माजली; पण त्यामधून सावरून निफ्टीने परत १०,०००चा टप्पा गाठला. दूरसंचार कंपन्यांच्या सरकारला देय असलेल्या महसुलाबाबत सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीमुळे बँका व सीमेवरील तणावामुळे संरक्षण क्षेत्राशी निगडित सरकारी कंपन्यांना बाजारात मागणी वाढली. लागोपाठ मिळणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांच्या पाठबळामुळे रिलायन्सचे कर्जमुक्त होण्याचे उद्दिष्ट साध्य झाले. कंपनीच्या बाजारमूल्याच्या उच्चांकाने निर्देशांकाना पाठबळ मिळाले. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीत अनुक्रमे ९५१ व २७२ अंकांची वाढ झाली. रिलायन्सचा सौदी अरामको कंपनीबरोबर होणारा तेल व रसायन उद्योगांमधील भागीदारीचा प्रलंबित करार व करोनानंतरच्या काळात डिजिटल व्यवहारांना येणारे महत्त्व लक्षात घेता कंपनीचे बाजारमूल्यामध्ये वाढीस आणखी वाव आहे.

महिंद्र अँड महिंद्रच्या गेल्या वर्षांच्या नफ्यात घट झाली असली तरी कंपनीने तोटय़ात जाणाऱ्या उद्योगांतून बाहेर पडण्याचे धोरण कसोशीने राबवण्यास सुरुवात केली आहे जे भविष्यासाठी दिलासा देणारे ठरेल. शेती उद्योगाचे सध्याचे उज्ज्वल भविष्य व सरकारचे पूरक धोरण कंपनीला पोषक आहे. चारचाकी वाहन क्षेत्रामधील गुंतवणुकीत मारुती सुझुकीच्या खालोखाल महिंद्रमधील गुंतवणूक फायद्याची ठरेल.

श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्सचे तिमाही निकाल फारसे चांगले नसले तरी टाळेबंदीनंतरच्या काळात नवीन वाहनांपेक्षा सेकंड हँड वाहनांना जास्त मागणी असेल. सेकंड हँड वाहनांना पतपुरवठा करण्याची कंपनीची ख्याती आहे व कंपनीजवळ भांडवलाची कमतरता नाही. आरती इंडस्ट्रीजचा ४,००० कोटींचा दीर्घ मुदतीचा विक्री करार रद्द केला गेला. जरी भविष्यात त्याबद्दलची भरपाई मिळणार असली तरी त्यासाठी वाढवलेली उत्पादन क्षमता अन्यत्र वापरण्यास वेळ लागेल. त्याचा या वर्षीच्या नफ्यावर परिणाम होईल. कंपनीतील गुंतवणुकीत नफा वसूल करून नवीन गुंतवणुकीसाठी वाट पाहणे फायद्याचे ठरेल. अशोका बिल्डकॉनच्या नफ्यात गेल्या तिमाहीच्या ६७ टक्के तर पूर्ण वर्षांसाठी ३५ टक्के वाढ झाली आहे. करोनामुळे नजीकच्या काळात कारभारावर परिणाम झाला तरी असलेली मागणी व कर्जाचे कमी झालेले प्रमाण पाहता गुंतवणूक फायद्याची ठरेल.

वाहन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सुप्राजित इंजिनीअरिंगच्या कारभारावर शेवटच्या तिमाहीत परिणाम झाला; परंतु वाहनांसाठी विशेषत: दुचाकीसाठी लागणाऱ्या विविध केबल्सची ही कंपनी प्रमुख पुरवठादार आहे. वाहन क्षेत्रातील मागणीत अपेक्षित सुधारणा व भारत-६ च्या निकषांसाठी वाहनातील केबल्सचे वाढलेले प्रमाण ध्यानात ठेवून सध्याच्या बाजारमूल्यात या कंपनीत गुंतवणुकीसाठी संधी वाटते.

सध्या बाजार कुठल्याही नकारात्मक बाबींना जुमानत नसला तरी  सीमा क्षेत्रातील तणावामुळे चीनबरोबरच्या संबंधातील बदल व चीनकडून होणाऱ्या आयातीवरील निर्बंधांमुळे कंपन्यांची नवीन आर्थिक समीकरणे कंपन्यांच्या बाजारमूल्यावर परिणाम करतील.

sudhirjoshi23@gmail.com