सुधीर जोशी

देशाचा आर्थिक वृद्धीदर आणखी खालावण्याचा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेने आणि विविध संस्थांनी वर्तविल्यामुळे गेल्या आठवडय़ातील नरमाईचे वातावरण याही आठवडय़ात पहिल्या दिवशी टिकून राहिले. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महागाई भत्त्यातील वाढीमुळे बुधवारी आलेली तेजी अल्पजीवीच ठरली. चार दिवसांच्या व्यवहारात निर्देशांक एक आड एक दिवस मोठे चढ-उतार दाखवत होते. सप्ताहाची अखेर सेन्सेक्सने ४५४ अंश, तर निफ्टीने १३१ अंशांच्या साप्ताहिक वाढीने झाली.

या आठवडय़ात जाहीर झालेल्या टीसीएस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठय़ा कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करताना व्यवस्थापनाने पुढील सहा महिन्यांच्या उत्पन्न वाढीवर साशंकता व्यक्त केली, तसेच डिजिटल क्षेत्रातील उत्पन्न वाढ कमी झाल्याचे जाहीर केले. बाजाराने त्यावर प्रतिक्रिया देऊन टीसीएसचे समभाग दोन टक्क्यांनी घसरले. अंतरिम लाभांशाच्या वाटपानंतर कंपनीच्या समभागातील अपेक्षित घसरण खरेदीची संधी देईल. इंडसइंड बँकेचा समभागदेखील दुसऱ्या तिमाही निकालांनंतर नफ्याच्या वाढीतील घसरणीने व बुडीत कर्जाच्या वाढत्या प्रमाणामुळे दोन टक्क्यांनी घसरला. बाजार संपल्यावर जाहीर झालेले इन्फोसिसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल बाजाराला अपेक्षित असे राहिले व त्यामुळे इन्फोसिसच्या समभागात नुकतीच झालेली वाढ पुढील आठवडय़ात कायम राहण्याची शक्यता आहे.

जागतिक मंदीच्या आव्हानाचा सामना करणारी व सध्या बिकट परिस्थितीमधून जाणाऱ्या टाटा स्टील या अग्रगण्य कंपनीचे समभाग सध्या तीन वर्षांपूर्वीच्या पातळीवर आले आहेत. कंपनीने परदेशात अधिग्रहण केलेले व्यवसाय तोटय़ात आहेत. कंपनी त्यामधून बाहेर पडण्याचे प्रयत्न करीत आहे व त्याला यशही मिळत आहे. भारतातील व्यवसाय फायद्यात आहे व त्यात नुकत्याच अधिग्रहण केलेल्या भूषण स्टील व उषा मार्टनि स्टीलची भर पडली आहे. शंभरहून जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या व भारतातील सचोटीने व्यवसाय करणाऱ्या उद्योग समूहातील एका मोठय़ा कंपनीला (जी मूलभूत कच्चा माल – पोलाद बनविते) जागतिक व भारतातील उद्योगांचे मंदीचे सावट जसे दूर होईल तसतसा ऊर्जति काळ येईल. कंपनीचे समभाग आता टप्प्याटप्प्याने खरेदी केले तर दोन ते तीन वर्षांच्या मुदतीमध्ये चांगला परतावा देतील.

सरकारने उद्योग वाढीसाठी केलेल्या कंपन्यांवरील कर कपात, व्याज दर कपातीसारख्या उपाययोजनांमुळे बाजारात येणारा उत्साह क्षणिक ठरून बाजार जागतिक मंदीच्या फेऱ्यामुळे जास्त व्यथित आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत निर्देशांकातील वाढीपेक्षा समभागांच्या मूल्यातील वाढ कंपनीसापेक्ष असेल. सामान्य जनतेची मिळकत वाढून त्यांचा खर्चावरील हात सढळ होण्यासाठी तसेच खासगी उद्योगांच्या व्यवसायवाढीला पूरक निर्णयांची सरकारकडून बाजाराला अपेक्षा आहे. बाजाराचे लक्ष आता पुढील आठवडय़ातील हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, विप्रो तसेच एसीसीसारख्या दिग्गज कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर व भारत-चीन अनौपचारिक बठकीतील निर्णयांवर असेल.

sudhirjoshi23@gmail.com