सुधीर जोशी

ब्रिटनमध्ये चाहूल लागलेल्या नव्या करोनाने बाजाराला सप्ताहाच्या सुरुवातीलाच तडाखा दिला. लगोलग जाहीर झालेल्या निर्बंधांमुळे परत एकदा भयाचे वातावरण तयार होऊन बाजार घसरला आणि एका दिवसात गुंतवणूकदारांचे सात लाख कोटींचे नुकसान झाले. उर्वरित तीन दिवसांत बाजाराने करोनाची भीती बाजूला सारून आगेकूच सुरूच ठेवली. त्याला मुख्य हातभार लावला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने व युरोपातील ब्रेग्झिटचा तोडगा प्रत्यक्षात येण्याच्या बातमीने.

सोमवारचे सारे नुकसान भरून काढून बाजाराचे प्रमुख निर्देशांक पुन्हा उच्चत्तम शिखराजवळ बंद झाले व गुंतवणूकदारांना या रूपाने नाताळाची भेट मिळाली!

विप्रोने आपल्या व्यवस्थापन चमूमध्ये केलेल्या मोठय़ा बदलानंतर नवीन कंत्राटे मिळवण्यामध्ये जोरदार मुसुंडी मारली आहे. मेट्रो, ऑलिंपस, थॉटस्पॉट, फोर्टम व व्हेरिफोन अशा पाच परदेशी कंपन्यांची माहिती सेवा कंत्राटे कंपनीला मिळाली आहेत. त्यातील मेट्रोचे कंत्राट सर्वात मोठे असून त्यामुळे कंपनीला युरोपमधील स्थान बळकट करता येईल.

कंपनीच्या भविष्यातील उत्पन्नवाढीच्या अपेक्षा यामुळे वाढल्या आहेत. पूर्वापार कंपनी भागधारकांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ करत आली आहे. पुढील सप्ताहात कंपनीची समभाग पुनर्खरेदी सुरू होत आहे. सध्याचे बाजारमूल्य नव्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक वाटते.

इन्फोसिसने डेमलर एजीबरोबर एक करार केल्याची घोषणा केली आहे. हा करार ‘आयटी इन्फ्रास्ट्रर ट्रान्सफॉर्मेशन’ प्रकारातील असून इन्फोसिस जर्मनी, उर्वरित युरोप, अमेरिका आणि विविध भौगोलिक भागात काम करणाऱ्या डेमलरच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेईल.

डॅमलर आणि इन्फोसिस संयुक्त भागीदारी तत्त्वावर वाहन उद्योगाला उपयुक्त ठरणाऱ्या हायब्रिड क्लाऊड-चलित प्रणाली विकसित होईल. या भागीदारीमुळे डेमलर त्यांच्या वाहन उद्योगासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. इन्फोसिसने या कराबाबतच्या आर्थिक बाबींवर भाष्य करणे टाळले असेल तरी इन्फोसिसला झिरो-ट्रस्ट नेटवर्क, स्मार्ट हायब्रिड क्लाऊड, मल्टी क्लाउड ट्रॅव्हल आणि व्यक्तिचलित आणि आज्ञात्मक ‘एआय’ या गोष्टींचा फायदा होईल. या कराराचा लगेचच फायदा होणार नसला तरी वाहन उद्योगात इन्फोसिसचा दबदबा वाढेल.

सलगपणे वर जाणाऱ्या बाजारात येणारा मंदीचा तडाखा अशाच वेळी येतो जेव्हा सर्व आलबेल वाटत असते. त्याची चुणूक याच सप्ताहात पाहायला मिळाली. परदेशी गुंतवणूकदारांचा अखंड ओघ सुरू असल्यामुळे बाजार अशा वादळातून ‘सही सलामत’ बाहेर येत आहे. बाजाराने परत तेजीची वाटचाल सुरू होण्याचे संकेत दिले असले तरी करोनाबाबतची कुठलीही नकारात्मक बातमी बाजारावर आघात करू शकते.

सरत आलेल्या २०२० वर्षांने शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तेजी-मंदीचा अनोखा अनुभव दिला. एका जागतिक संकटातून बाहेर येण्याआधीच बाजाराचे निर्देशांक वार्षिक तुलनेत १२ टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात वर गेले आहेत. इतर अनेक उद्योग व अर्थव्यवस्था बिकट अवस्थेमधून जाताना हा परतावा निश्चितच चांगला आहे.

या वर्षांतील करोना महासाथीच्या संकटाने सर्वच उद्योगांना तंत्रस्नेही बनण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र गुंतवणुकीसाठी पुढील दोन ते तीन वर्षे आश्वासक राहाणार आहे.

अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या पलीकडे आरोग्य ही महत्त्वाची गरज समोर आली आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रतिबिंब बँकिंग क्षेत्रात दिसून येत असते. नव्या वर्षांतील गुंतवणुकीत या गोष्टी समोर ठेवून आपल्या पोर्टफोलियोमधील या क्षेत्रांचा सहभाग वाढवायला हवा.