16 October 2019

News Flash

बाजार-साप्ताहिकी : तेजीची चत्र पालवी

नेहमीप्रमाणे इन्फोसिस आणि टीसीएस हे सलामीचे वीर बाजाराला पुढील आठवडय़ात दिशा देतील

(संग्रहित छायाचित्र)

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

नवीन अर्थवर्षांची दमदार सुरुवात करून मुंबई बाजाराच्या निर्देशांकाने आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशी ३९,०००चा विक्रमी टप्पा पार केला. वस्तु-सेवा कराच्या संकलनाची वार्षिक उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली, रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा आणि अमेरिका-चीन वाटाघाटींचा नव्याने प्रारंभ अशी काही कारणे त्याला जबाबदार ठरली. मात्र उर्वरित दोन दिवस निर्देशांकात घसरण झाली आणि पहिल्या दोन दिवसांतील सर्व कमाई नाहीशी झाली. खासगी वेधशाळा – ‘स्कायमेट’ने मोसमी पावसाबाबत सरासरीपेक्षा कमी केलेले अनुमान, रेपो रेट अपेक्षेनुसार कमी झाल्यावर बाजाराची संपलेली उत्सुकता तसेच कमी विकास दर वाढीचा अंदाज आणि वरच्या थराला झालेली नफावसुलीसाठी विक्री यांचा हा परिणाम होता. मात्र शेवटच्या दिवशी निर्देशांकानी पुन्हा उसळी घेऊन तेजीच्या आशा कायम ठेवल्या. आठवडाअखेर मुंबई बाजाराच्या निर्देशांकात १८९ आणि निफ्टीमध्ये ४२ अंशांची वाढ झाली.

स्टेट बँक समूहाच्या एकत्रीकरणानंतर आता बँक ऑफ बडोदाने केलेले इतर दोन बँकांचे अधिग्रहण आणि सरकारचा वाढीव भांडवल पुरवठा यामुळे सरकारी बँकांच्या सबलीकरणाची सुरुवात झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे १२ फेब्रुवारी २०१८ रोजीचे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी त्यासाठी नवीन परिपत्रक काढून थकीत कर्जदार कंपन्यांविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेला खीळ बसू नये याकरिता रिझव्‍‌र्ह बँक प्रयत्नशील आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षित (०.२५ टक्के) व्याजदर कपात केलीच आहे. बँकांचे व्याजदर कमी होण्यास थोडा अवधी लागेल. त्याचा कर्जाच्या मागणीवर होणारा परिणाम पुढील चार-सहा महिन्यांत दिसू लागेल. मार्चअखेरचे वार्षिक निकाल पाहून सरकारी बँकांमधे गुंतवणुकीचा विचार करता येईल.

मुंबई बाजाराच्या निर्देशांक आणि निफ्टी निर्देशांक त्यांच्या सर्वोच्च शिखराजवळ जात असताना सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडलेला प्रश्न म्हणजे त्यांचा पोर्टफोलियोमध्ये ही वाढ का दिसत नाही? याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या समभागात निफ्टीमधील समभागांचे असणारे अल्प प्रमाण आणि दुसरे म्हणजे जरी निफ्टी सर्वोच्च शिखराजवळ जात असला तरी त्यातील फक्त दहा-बारा समभागच त्यांच्या गेल्या वर्षांतील सर्वोच्च भावाच्या जवळ आहेत.

शिवाय निफ्टी मिडकॅपचा तेजीतील सहभागही नगण्य आहे. गेल्या एक वर्षांत निफ्टीने १४.५० टक्के परतावा दिला आहे तर निफ्टी मिडकॅप १०० चा परतावा आहे उणे ३.९० टक्के!

पुढील आठवडय़ात कंपन्यांच्या वार्षिक निकाल मोसमास सुरुवात होत आहे. नेहमीप्रमाणे इन्फोसिस आणि टीसीएस हे सलामीचे वीर बाजाराला पुढील आठवडय़ात दिशा देतील. रुपयाच्या तुलनेत मजबूत बनलेल्या अमेरिकी डॉलरच्या पाश्र्वभूमीवर या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे येणाऱ्या वर्षांचे अंदाजही महत्त्वाचे ठरतील. या निकालांप्रमाणेच बाजार फेब्रुवारीच्या औद्योगिक उत्पादनाचे आकडे आणि मार्च महिन्याच्या घाऊक महागाई निर्देशांकावर लक्ष ठेवील.

First Published on April 6, 2019 1:37 am

Web Title: weekly stock market weekly market review weekly equity market analysis