News Flash

बाजार-साप्ताहिकी : सावध ऐका पुढल्या हाका

सरकारच्या घसरत्या महसुलावर उपाय म्हणून जीएसटी दरात वाढीचा विचार सुरू आहे

सुधीर जोशी – sudhirjoshi23@gmail.com

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणावर गेल्या आठवडय़ाच्या शेवटी नाराजी व्यक्त करणाऱ्या बाजाराने या सप्ताहाची सुरुवात तेजीने केली. मंगळवारचा अपवाद वगळता बँक निफ्टीच्या सहभागाने बाजार रोज थोडय़ा फरकाने वर जात राहिला आणि शेवटच्या दिवशी त्याने मोठी उसळी घेतली. सप्ताहअखेर सेन्सेक्समध्ये ५६४ अंशांची तर निफ्टीमध्ये १६५ अंशांची वाढ झाली.

स्टेट बँकेने मागील अर्थवर्षांतील बुडीत कर्जातील १२ हजार कोटी रुपयांच्या तफावतीबाबत दिलेल्या कबुलीमुळे बँकेच्या समभागात घसरण दिसून आली. हा आकडा जरी मोठा असला तरी बँकेने दिलेल्या एकूण कर्जाच्या केवळ अर्धा टक्का आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी तिकडे दुर्लक्ष केले.

मोबाइल सेवा पुरविणाऱ्या इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीजने देखील जिओच्या मोबाइल सेवेत ३९ टक्क्यांपर्यंत दरवाढ केली आहे. त्याचा मोठा लाभ कंपनीला मिळेल. त्याचे परिणाम रिलायन्सच्या समभाग मूल्यात गेल्या दोन आठवडय़ांत दिसले. रिलायन्स रिटेलचे बाजार भांडवल पाच लाख कोटी रुपये असल्याचा ढोबळ अंदाज आहे. बाजार भांडवलाचे विक्रीशी गुणोत्तर लक्षात घेता या समभागाचे मूल्यांकन पाच ते सात वर्षांसाठी मुळीच अवास्तव वाटत नाही.

सरकारच्या घसरत्या महसुलावर उपाय म्हणून जीएसटी दरात वाढीचा विचार सुरू आहे. तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेटवर कर वाढण्याच्या शक्यतेमुळे आयटीसीचे समभाग खाली आले आहेत. परंतु ग्राहक उपभोग्य वस्तूंच्या क्षेत्रामधील मोठय़ा कंपन्यांमध्ये हा सर्वात कमी किमतीत उपलब्ध समभाग असून गेल्या सहामाहीचे निकाल व कंपनीच्या सिगारेटच्या व्यवसायावरील कमी होणारे अवलंबित्व लक्षात घेता या समभागांमध्ये गुंतवणुकीची संधी पुढील आठवडय़ात मिळू शकेल.

सध्या ‘भारत बाँड ईटीएफ’ची प्राथमिक विक्री सुरू आहे. हा भारतातील पहिला कॉर्पोरेट बाँड ईटीएफ असून गुरुवारपासून गुंतवणुकीसाठी खुली झालेली विक्री येत्या शुक्रवापर्यंत सुरू असेल. केंद्र सरकारच्या मालकीच्या निवडक ‘एएए’ पत असलेल्या कंपन्यांच्या रोख्यांत हा फंड गुंतवणूक करेल. रोखे बाजार व्याज, मुद्दलाच्या परतफेडीच्या अनियमिततेवर हेलकावे घेत असताना केंद्र सरकारच्या मालकीच्या महारत्न, नवरत्न दर्जाच्या व उच्च दर्जाची पत धारण करणाऱ्या कंपन्यांच्या रोख्यांत गुंतवणुकीची संधी आहे. अत्यंत अल्प व्यवस्थापन शुल्क असलेला भारत बाँड ईटीएफ हा गुंतवणूकदारांसाठी निश्चित उत्पन्न मिळविण्याचा चांगला पर्याय आहे, विशेषत: जे तीन वर्षे किंवा दहा वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुसंधी आहे. तशीच संधी उत्तम व्यावसायिक उद्योगसमूहाचे पाठबळ लाभलेल्या एल अ‍ॅण्ड टी फायनान्सच्या रोखे विक्रीमध्येही असणार आहे.

वाढती महागाई, घसरता विकास दर व औद्योगिक उत्पादनातील घट अशा देशांतर्गत चिंतेच्या बाबी असताना, अमेरिकी फेडचा व्याज दर जैसे थे राखण्याचा निर्णय, ब्रिटनच्या निवडणुकांचे निकाल, व्यापार युद्ध संपण्याची शक्यता अशा जागतिक घडामोडींमुळे बाजार वरची पातळी राखून आहे. कोणतीही नकारात्मक बातमी बाजार दुर्लक्षित

करतो आहे जे धोक्याचे लक्षण आहे. या परिस्थितीत थोडा नफा पदरात पाडून घेण्याचे धोरण व्यवहार्य ठरू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 4:29 am

Web Title: weekly stock markets analysis weekly stock market review weekly share market review zws 70
Next Stories
1 सेन्सेक्समध्ये ४२८ अंशांची उसळी
2 संथ अर्थव्यवस्थेला दुहेरी धक्का
3 किमान ‘जीएसटी’ दर टप्पा  ५ वरून ८ टक्क्य़ांवर जाणार?
Just Now!
X