भांडवली बाजारावर विपरीत परिणाम करणाऱ्या कर तरतुदी मागे घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयांचे अपेक्षित पडसाद सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रअखेर दिसून आले. एकाच व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ७९३ अंशांची झेप घेत ३७,५०० समीप पोहोचला. तर २०० हून अधिक अंश वाढीने निफ्टीने ११ हजाराचा टप्पा गाठला.

शुक्रवारच्या तुलनेत दोन्ही प्रमुख निर्देशांकातील वाढ प्रत्येकी १.६० टक्क्यांहून अधिक राहिली. सरकारच्या नव्या पाठबळामुळे बँक क्षेत्रांतील समभाग १० टक्क्यांनी वाढले. तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता २.४१ लाख कोटी रुपयांनी वाढली. सूचिबद्ध कंपन्यांची एकूण मालमत्ता सोमवारअखेर १४० लाख कोटी रुपयांवर गेली.

एकूण ७९२.९६ अंश वाढीसह सेन्सेक्स ३७,४९४.१२ वर, तर २२८.५० अंश वाढीने निप्टी ११,०५७.९० पर्यंत पोहोचला. एकाच व्यवहारात प्रमुख निर्देशांकांनी त्यांची गेल्या तीन महिन्यातील सर्वोत्तम सत्रझेप सोमवारी नोंदविली. वधारते खनिज तेलाचे दर आणि घसरत्या रुपयाकडे दुर्लक्ष करतानाच गुंतवणूकदारांनी अमेरिका-चीन व्यापार युद्ध शमण्याबाबतची आशा बाजारातील समभाग खरेदीच्या माध्यमातून व्यक्त केली.

सोमवारच्या सत्राची सुरुवात ६६३ अंशाने करताना मुंबई निर्देशांकाने व्यवहारात काहीशी किमान पातळीही गाठली. मात्र सत्रा दरम्यान त्यातील भर १,०५२ अंशांची ठरली. तर निफ्टीने १०,७५६.५५ या किमान स्तरापासून ११,०७०.३० असा वरचा प्रवास अनुभवला. केंद्रात मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतरची सोमवारची झेप सर्वोत्तम ठरली.

रुपया डॉलरच्या तुलनेत ७२ पुढे

भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण असताना परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सोमवारी त्याच्या गेल्या नऊ महिन्यांच्या तळात विसावले. सप्ताहारंभीच्या पहिल्याच व्यवहारात स्थानिक चलन थेट ३६ पैशांनी रोडावत ७२.०२ या पातळीवर स्थिरावले. रुपयाचा यापूर्वीचा ७२ पुढील किमान स्तर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी होता.

सोने दर ३८,५६० रुपये पार

डॉलरच्या तुलनेत रुपया नऊ महिन्यांच्या तळातील प्रवास नोंदवीत असताना शहरात मौल्यवान धातूचे दर पुन्हा एकदा ऐतिहासिक टप्प्याकडे झेपावले. स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा दर एकाच व्यवहारात थेट ९५५ रुपयांनी वाढून ३८,५६० रुपयांवर स्थिरावला. तर किलोसाठी चांदी तब्बल १,३९५ रुपयांनी महाग होत ४५,२१५ रुपयांवर थांबली.