नॉर्थ ब्लॉकच्या कडेकोट बंदोबस्तात गेले दहा दिवस एक ‘हलवा’ शिजत आहे. तो रसनातृप्ती करणारा गोड गोड पदार्थ आहे की डोळ्यात पाणी आणणारा तिखटजाळ पदार्थ आहे, हे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम हे गुरुवारी केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील त्यानंतरच स्पष्ट होईल.
अर्थ खात्याचे अत्यंत बडे अधिकारी दरवर्षी अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरविण्याआधी शुभसंकेत म्हणून ‘हलवा’ चाखतात. अर्थात अर्थसंकल्पावर जितका गोपनीयतेचा घट्ट पोलादी पडदा असतो तसाच तो या प्रथेवरही आहे. अर्थसंकल्पाचे दिवस जवळ आले की नॉर्थ ब्लॉकच्या अर्थखात्याच्या कार्यालयावरच गोपनीयतेचा पडदा पडतो.
या अर्थ खात्याच्या कार्यालयाच्या तळघरात अर्थसंकल्पाचा छापखाना असतो. तेथे छपाईसाठी आलेल्या शेकडो रिम कागदांनाही आपल्यावर कोणत्या सवलती छापल्या जाणार आहेत आणि कोणते नवे र्निबध छापले जाणार आहेत, याचा पत्ता नसतो. सरकारी मुद्रणालयांमधून खास यंत्रणेद्वारे निवडलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांवर छपाईची जबाबदारी असते आणि सरकारी तंत्रज्ञ या कामावर बारीक नजर ठेवतात. यातील कुणालाही मोबाइल फोन आत नेता येत नाहीच पण कुणाला भेटताही येत नाही. अर्थसंकल्प मांडण्याआधी दहा दिवसांसाठी हे सर्व कर्मचारी जणू नजरबंद असतात. अर्थसंकल्पाची छपाई २४-२५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होते. त्यानंतर मध्यरात्रीच कडेकोट बंदोबस्तात अर्थसंकल्पाची प्रत व अन्य गोपनीय कागदपत्रे संसद भवनात नेली जातात. गुरुवारी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतील आणि मे अखेरीस तो मंजूर होईल.
चिदम्बरम यांचे आठवे रूप!
अर्थमंत्री या नात्याने गुरुवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची भूमिका पी. चिदम्बरम तब्बल आठव्यांदा वठवणार आहेत. याआधी केवळ मोरारजी देसाई यांनी आठ वेळा अर्थसंकल्प मांडला होता.