News Flash

इच्छापत्र: समज-गैरसमज २ आवश्यक ऐवज काय?

इच्छापत्र या महत्त्वपूर्ण विषयावर आजचे हे दुसरे पुष्प.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| दिलीप राजपूत

इच्छापत्र या महत्त्वपूर्ण विषयावर आजचे हे दुसरे पुष्प. आधीच्या लेखात (अर्थ वृत्तान्त, १० सप्टेंबर) डॉ. मेधा शेटय़े यांनी लिहिलेल्या मुद्दय़ांना पुढे नेणारा हा लेख. आपल्या विविध प्रश्नरूपी प्रतिक्रियांना उत्तरे देण्याचा सर्वागीण प्रयत्न केला आहे.

मागील लेखात आपण इच्छापत्र (Will) का लिहावे याची गरज आणि महत्त्व जाणले. हे इच्छापत्र लिहिणे अतिशय सोपे आहे. कोणीही ज्यांची इच्छा आहे त्यांनी इच्छापत्र लिहावे मात्र त्यातील मजकुराचे काही ठळक मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.

‘इच्छापत्र’ हा असा दस्तऐवज आहे की जो लिहिणाऱ्याच्या म्हणजे जो मालक आहे त्याने आपल्या (स्थावर किंवा अस्थावर) मालकीचा, आपल्या मिळकतीविषयी आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या हयातीत अथवा हयातीत नसताना, कसे योग्य रीतीने वाटप किंवा विभाजन व्हावे, अशी सूचना करतो त्याचे लिखित रूप म्हणजे इच्छापत्र होय.

  • इच्छापत्राचा कायद्याच्या मापात बसणारा असा नमुना नाही. म्हणून ‘इच्छापत्र’ स्वलिखित किंवा टंकलिखित असावे. ज्यांचे हस्ताक्षर खराब असेल त्यांनी ते जरूर टंकलिखित करून घ्यावे.
  • भाषा वापरण्याचे काहीही नियमही नाहीत. साधे, सोपे समजणारे शब्द वापरून आपल्या इच्छित विचारानुसार ते बनवावे. आपल्या इच्छा योग्य शब्दांचा वापर करून लिहिणे अनुकूल असते की, जेणेकरून गरसमज (नंतर होणारे) टाळता येतील.
  • स्थावर/अस्थावर मालमत्तेचे वर्णन व आíथक वाटपाचे, विभाजनाचे वर्णन यामध्ये स्पष्टता बाळगावी.
  • एक महत्त्वाची बाब ही की, हा विषय प्रामुख्याने आपण जिवंत नसताना पुढे येतो. म्हणून ‘स्पष्टता बाळगणे’ हाच इच्छापत्र लिहीत असताना किंवा लिहून घेताना प्रधान नियम मानावा. आपल्याला जे ज्याला द्यायचे आहे ते कारणासहित मुद्देसूद स्वरूपात लिहावे. जे काही ज्याला द्यायचे नाही हेही कारणासहित लिहावे.
  • ‘इच्छापत्र’ लिहिताना संभाव्य परिस्थितीचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे इच्छापत्र केले आहे. परंतु, पत्नीचा जर पतीच्या आधी काळ आला तर काय? अशा संभाव्य परिस्थितीला गृहीत धरून मग पतीने आपल्या संपत्तीचे वाटप व विभाजन करणे हितकारक असते. यासारख्या अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक असते.
  • जरी इच्छापत्राचा कायद्याने संमत नमुना नसला तरीही आपले स्वलिखित किंवा टंकलिखित इच्छापत्र आपल्या स्वाक्षरीने आणि इतर/अन्य दोन परिचित साक्षीदारांच्या स्वाक्षरींनी पूर्ण होते.
  • वयोवृद्ध व्यक्ती किंवा ज्या व्यक्ती आजारपणामुळे त्रस्त असतील त्यांनी डॉक्टरच्या प्रमाणपत्राची जोड इच्छापत्राला देता येऊ शकते. कौटुंबिक डॉक्टरच जर साक्षीदार असेल तर अतिउत्तम!

इच्छापत्र लिहिण्याची काही वयोमर्यादा नसते. फक्त भाषेचे स्पष्टतेचे सोपे नियम बाळगले गेले पाहिजेत. तर इच्छापत्र हे आपल्या इच्छेचे लिखित स्वरूप असते. नवरात्रीच्या शुभकाळाचे पर्व चालू आहे. आता शेवट करताना सरस्वतीचे म्हणजे ‘इच्छापत्र’ करण्याच्या गरजेचे ‘ज्ञान’ व प्रियजनासाठी संपत्तीची म्हणजेच ‘लक्ष्मी’ची आदराने केलेली तरतूद होय. असा प्रत्येक प्रौढाच्या मनी वसा असला पाहिजे ही सदिच्छा!

willassure@gmail.com

(लेखक कायदाविषयक तज्ज्ञ)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:06 am

Web Title: what is will
Next Stories
1 जादू याची पसरे मजवरी
2 गुंतवणुकीला शोभिवंत रंगसाज!
3 मुद्राधोरणाचे ‘एकच लक्ष्य’
Just Now!
X