पंतप्रधानांनी व्यवसायपूरक वातावरण तयार करण्याकडेही पाहावे : रतन टाटा
यापूर्वी काँग्रेस सरकारवर वेळोवेळी टीका करणाऱ्या रतन टाटा यांनी या वेळी केंद्रातील मोदी सरकारवर सावध शाब्दिक हल्ला केला आहे. पंतप्रधानांबाबत सावध प्रतिक्रिया देताना टाटा यांनी कंपन्या, उद्योग यांच्यासाठी प्रत्यक्ष व्यवसायपूरक वातावरण हे प्रत्यक्षात दिल्या जाणाऱ्या आश्वासनाहून अधिक गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
बंगळुरू येथे एका कार्यक्रमास गुरुवारी उपस्थित राहिलेल्या टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केवळ आश्वासनेच देशातील गुंतवणूक वाढविण्यास पुरेशी नाहीत; तर कंपन्यांकरिता पूरक व्यवसायविषयक वातावरणही उपलब्ध झाले पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनांना प्रतिसाद म्हणून जेव्हा विदेशी गुंतवणूकदार येथे येतील तेव्हा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने व्यवसाय सुलभ करणाऱ्या वातावरणाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘सीएमआयई’च्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत नव्या उद्योगांचे प्रस्ताव ७४ टक्क्यांनी घसरले आहेत. केवळ ३८३ प्रकल्पांनी या तिमाहीत एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ही आकडेवारी गेल्या पाच तिमाहीतील सर्वात कमी आहे.
केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारबद्दल पहिल्या सहा महिन्यांतच उद्योग क्षेत्राची नाराजी सर्वप्रथम एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केली होती. यानंतर बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनीही असेच मत व्यक्त केले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत टाटा यांनी थेट काँगेसवर हल्ला केला होता. सिंगूरच्या रूपाने काँग्रेस राजकारणाचा फटका बसल्यानंतर टाटा समूहाने त्यांचा नॅनो कार उत्पादन प्रकल्प भाजपाशासित गुजरातमध्ये स्थलांतरित केला होता.