करोना-टाळेबंदीमुळे सलग दोन तिमाहीत शून्याखालील दर गाठणारा भारताचा अर्थप्रवास तेथून पुढे मात्र सकारात्मक असेल, असा आशावाद विविध वित्तसंस्था, दलाली पेढय़ांनी मंगळवारी व्यक्त केला. लोकांच्या क्रयशक्तीतील वाढ आणि सरकारचे वाढीव खर्चाचे धोरण यामुळे भारताचा अर्थविकास शून्यापुढील विधायक वळणाचा असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यान विकास दर ०.७ टक्के असेल असे इक्रा या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घसरत असलेला विकास दर तूर्त तरी उणे स्थितीतच राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
अमेरिकी दलालीपेढी बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने भारताचा विकास दर डिसेंबर तिमाहीत उणे एक टक्का असेल, असे आपल्या ताज्या अहवालात नमूद केले आहे. चालू दुसऱ्या वित्त वर्षांत देशाची अर्थव्यवस्था सावरून संपूर्ण वर्षांत उणे ७ ते ७.७ टक्के होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
दीड महिन्यानंतर सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असे ‘एस अँड पी’ या जागतिक पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. करोना साथ आजारावरील नियंत्रण, टाळेबंदीतील शिथिलीकरण तसेच सरकारकडून होणारा खर्च व देशाच्या कृषी क्षेत्राच्या प्रवासाच्या जोरावर भारताला हे यश गाठता येईल, असेही वित्तसंस्थेने म्हटले आहे.
वित्त वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत उणे २३.९ टक्के असा गेल्या चार दशकांतील विक्रमी विकासदर तळ भारताने नोंदवला आहे. तर दुसऱ्या तिमाहीतही तो काहीसा सावरत मात्र उणेच (७.५ टक्के) राहिला आहे. तिसऱ्या तिमाहीचे आकडे महिनाअखेर स्पष्ट होणार आहेत. अनेक अर्थतज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग उणे स्थितीतच (०.४ ते ०.७ टक्के) राहण्याचा अंदाज बांधला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्ध वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादन दर उणे १५.७ टक्के आहे.
व्यावसायिक आशावाद उंचावला!
ग्राहकांकडून वस्तू तसेच सेवेसाठीची मागणी वाढल्याने व पुरवठाही सुरळीत होऊ लागल्याने चालू तिमाहीत व्यवसाय आशावाद उंचावल्याचे डन अँड ब्रॅडस्ट्रीट (डी अँड बी)च्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. जानेवारी ते मार्च २०२१ मध्ये वित्तसंस्थेचा निर्देशांक ७९.९ अंश नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात २६.८ टक्के भर पडली आहे. डिसेंबर २०२० मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात विविध कंपन्यांच्या मुख्याधिकारी, व्यवस्थापकीय संचालक पदावरील ३५० व्यक्ती त्यात सहभागी झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:16 am