नवी दिल्ली : तब्बल ४० कोटी वापरकर्ते असलेली लोकप्रिय संदेश प्रणाली सेवा व्हॉट्सअ‍ॅप लवकरच बहुप्रतीक्षित देयक सेवाही या मंचावरून सुरू करीत आहे. या क्षेत्रातील प्रस्थापित  पेटीएम, फोनपे आणि गुगलपेशी ही सेवा स्पर्धा करेल. व्हॉट्सअ‍ॅपने वर्षभरापूर्वी या सेवेचे भारतात प्रयोग स्वरूपात परीक्षण सुरू केले होते.

व्हॉट्सअ‍ॅपचे जागतिक प्रमुख विल कॅथकार्ट यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, संदेश धाडण्याइतक्याच सहजतेने पैशांचेही हस्तांतरण व्हावे असा आपल्या कंपनीचा ध्यास आहे. भारतात देयक सेवेच्या अनावरणाची तयारी जवळपास पूर्ण केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, धोरणकर्ते आणि नियंत्रक संस्थांकडून आवश्यक मंजुऱ्या व मान्यता मिळविल्या गेल्या आहेत की नाहीत, याबद्दल त्यांनी कोणताही खुलासा केला नाही.

लोकप्रिय समाजमाध्यम फेसबुककडे सध्या व्हॉट्सअ‍ॅपची मालकी आहे. जगभरात त्याचे तब्बल दीड अब्ज वापरकर्ते असून, भारतासह अन्य प्रमुख बाजारपेठांमध्येही देयक सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे कॅथकार्ट यांनी सांगितले. भारतात विविध बँकांबरोबर ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीए) मानदंडांनुसार भागीदारीचे सोपस्कार पूर्ण केले गेले आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने दमदार पाऊल टाकताना, अधिकधिक लोकांचे आर्थिक समावेशनाला आपल्या प्रस्तावित देयक सेवेतून हातभारच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

घोडे कुठे अडले..?

वर्षभरापूर्वी परीक्षणे पूर्ण करूनही व्हॉट्सअ‍ॅपची ही सेवा  मूर्तरूप धारण करू शकली नाही. एकीकडे ग्राहकांचे प्रमाणीकरण व माहिती साठवण (डेटा स्टोरेज) पद्धतीबाबत धोरणकर्त्यांकडून वादाला तोंड फोडले गेले, तर दुसरीकडे स्थानिक स्पर्धक कंपन्यांनी व्हॉट्सअ‍ॅपकडून स्थापित दिशानिर्देशांचे पालन होत नसून, देयक मंचाकडून ग्राहक सुरक्षिततेच्या संबंधाने तडजोड केली जाईल, अशी ओरड सुरू केली. व्हॉट्सअ‍ॅपने देयक सेवेसंबंधी सर्व डेटा स्थानिक स्तरावरच जतन केला जाणार असल्याची ग्वाही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच दिली आहे.