करोना विषाणूजन्य साथीच्या कहराने भारताच्या कारखानदारीला लागलेले ग्रहण हे सलग पाचव्या महिन्यात पिच्छा पुरविताना दिसत आहे. सरलेल्या जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढीचा निर्देशांक उणे १०.४ टक्क्यांनी आक्रसल्याचे दिसून आले.

उल्लेखनीय म्हणजे बाजारातील मागणीअभावी ग्राहकोपयोगी उपकरणे आणि भांडवली वस्तूंच्या उत्पादनाला लागलेली घरघर हेच जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या १०.४ टक्के नकारात्मक कलाचे मुख्य कारण आहे. आधीच्या जून महिन्यातही या निर्देशांकात १५.७ टक्क्यांची दारुण घसरण दिसून आली आहे. खनिकर्म (-१३ टक्के), निर्मिती उद्योग (-११.१ टक्के) आणि वीजनिर्मिती (-२.५ टक्के) असे औद्योगिक क्षेत्रात सक्रियतेला चालना देणारी तिन्ही मुख्य क्षेत्र जुलैमध्ये घसरणीत राहिली.

भांडवली वस्तू निर्मिती क्षेत्रात २२.८ टक्क्यांची, तर ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू (कन्झ्युमर डय़ुरेबल्स) उत्पादन २३.६ टक्के असे जुलैमध्ये मागील वर्षांतील याच महिन्यातील कामगिरीच्या तुलनेत गडगडले आहे. या नकारार्थी प्रवाहाला अपवाद फक्त बिगर-टिकाऊ उपभोग्य वस्तूंचा (कन्झ्युमर नॉन डय़ुरेबल गुड्स) राहिला. एकवार उपयोगासाठी वापरात येणाऱ्या या वस्तूंच्या निर्मितीच्या क्षेत्राने ६.७ टक्के अशी सलग दुसऱ्या महिन्यात सकारात्मक वाढ नोंदविली आहे. टाळेबंदीच्या काळात संसर्गापासून संरक्षक मुखपट्टय़ा, पीपीई संच वगैरे वस्तू तसेच व्यक्तिगत निगा व स्वच्छतेची उत्पादने या वर्गवारीत येत असल्याने त्यांची कामगिरी सकारात्मक दिसून आली आहे.